IN PICS : गोड सुंदर चेहरे पुन्हा एकदा टीव्हीवर..! दीर्घकाळानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रींचं कमबॅक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:52 PM2022-03-17T17:52:15+5:302022-03-17T18:05:30+5:30

Marath Actress : छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका भेटीस आल्या आहेत, येत आहेत आणि या मालिकेतून जुने चेहरे पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. होय, अनेक मराठी अभिनेत्री अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत.

अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत राजनंदिनीची भूमिका केल्यानंतर शिल्पा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. होय, झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत ती स्वप्नील जोशीसोबत झळकणार आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची ताजी तरूण प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवर ‘बँड बाजा वरात’ या नवीन रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री रेणुका शहाणे टीव्हीवर पुनरागमन करताहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकर तब्बल 12 वर्षांनंतर मधुरा छोट्या पडद्यावर परतली आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मधुरा सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या नव्या मालिकेत झळकत आहे. सध्या ही मालिका चांगलीच गाजत आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या ‘असे हे सुंदर आमचे घर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 14 मार्चपासून सोनी मराठी या वाहिनीवर ही मालिका सुरू झाली .या मालिकेत उषा या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत सुकन्या मोने, सतीश पुळेकर आणि संचिता कुलकर्णी हे कलाकार देखील आहेत.

मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी लवकरच सोनी मराठीवरील ‘असे हे सुंदर आमचे घर’ या मालिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह वरील प्रीती ‘परी तुजवरी’ या मालिकेत संचिता मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर आता ‘असे हे सुंदर आमचे घर’ या मालिकेच्या निमित्ताने ती पुन्हा एका मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून आतापर्यंत पाच कलाकारांनी वेगवेगळ्या कारणांस्तव निरोप घेतला आहे. आता या मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री झाली आहे. या मालिकेद्वारे तितिक्षा तावडेने दीर्घकाळानंतर टीव्हीवर पुनरागमन केलं आहे.

अभिज्ञा भावे ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेत्री. अभिज्ञा ‘तू तेव्हा तशी’ या नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून तुमच्या आमच्या भेटीला येतेय. खुद्द तिनेच एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे.