प्राजक्तासाठी कायपण! पैलवान असून केला 'या' गोष्टीचा त्याग, शंभुराज म्हणाले, "८ महिन्यांपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:55 IST2025-08-10T13:44:32+5:302025-08-10T13:55:10+5:30

बघताच क्षणी प्रेमात पडले होते शंभुराज! प्राजक्ता म्हणाली...

ऑनस्क्रीन महाराणी येसूबाई म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा (Prajakta Gaikwad) नुकताच साखरपुडा झाला. शंभुराज खुटवड असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. योगायोगाने प्राजक्ताला खऱ्या आयु्ष्यातही संभाजीराजांचं नाव असणाराच नवरा मिळाला.

प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा शंभुराज खुटवड पुण्याजवळील फुरसुंगी मधला आहे. एका छोट्या अपघातामुळे दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून ते चांगले मित्र होते. मात्र शंभुराजला प्राजक्ता पहिल्या भेटीतच आवडली होती.

शंभुराज हा पैलवान असून तो एक उद्योजकही आहे. त्यांचे अनेक फॅमिली बिझनेस आहेत. शंभुराजचा फिल्मी क्षेत्राशी काहीही संबंध नाही. प्राजक्तालाही फिल्मी क्षेत्राबाहेरचाच मुलगा हवा होता.

साखरपुड्यानंतर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली. तसंच यावेळी प्राजक्ताने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. नक्की काय घडलं होतं?

शंभुराजने प्राजक्ताला लग्नासाठी विचारल्यावर तिने त्याला एक प्रश्न विचारला होता. 'तुम्ही नॉनव्हेज खाता का?' मीही आधी खात होते पण आता सोडलं. मला नॉनव्हेज खाणार मुलगा नकोय.'

प्राजक्ता म्हणाली, "मी असं म्हटल्यावर शंभुराज थेट पंढरपूरला गेले. तिथे त्यांनी माळ घातली आणि नॉनव्हेज कायमचं सोडलं. ३६५ दिवस नॉनव्हेज खाणारा मुलगा फक्त माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतो हा किती मोठा त्याग आहे. आता यांच्या घरात फक्त हे एकटेच आहेत जे नॉनव्हेज खात नाहीत."

यावर शंभुराज म्हणाले,"पैलवान क्षेत्रातला असल्याने मी रोज नॉनव्हेज खात होतो. ८ महिन्यांपासून मी माळकरी आहे. माळ घातली आहे. माझं ध्येय स्पष्ट होतं की पाहिजेल तर हिच पाहिजे."

प्राजक्ता फक्त २५ वर्षांची आहे. वेळेत लग्न व्हावं असं आईवडील म्हणाले म्हणून तीही तयार झाली. आता दोघं कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.