ऑनलाइन फूड ऑर्डर करणं ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात. म्हणाली- दर पाच मिनिटांनी अकाऊंटमधून.......

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:26 PM2023-07-24T12:26:16+5:302023-07-24T12:53:45+5:30

सिनेसृष्टीतील एक अभिनेत्री नुकतीच सायबर क्राईमची शिकार झाली आहे. ऑनलाईन जेवणं ऑर्डर करणं तिचा चांगलंच महागात पडलं.

सध्याचं युग हे डिजीटल युग म्हणून ओळखलं जातं. ई-कॉमर्सच्या साईटही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, आपल्याला आता कोणतीही वस्तु खरेदी करण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. घरपोच वस्तु काही तासात मिळतात, यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

पण, ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची फसवणूकही होत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन शॉपिंग सोयीस्कर आहे, यामध्ये तुम्ही घरबसल्या आरामात खरेदी करू शकता आणि सवलत देखील मिळवू शकता. ऑनलाइन खरेदी करताना अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत.

आतापर्यंत अनेकांना हजारोंचा फटका सहन करावा लागला आहे. याला सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. सिनेसृष्टीतील एक अभिनेत्री नुकतीच सायबर क्राईमची शिकार झाली आहे. अभिनेत्री आकांक्षा जुनेजा हिला ऑनलाइन पद्धतीनं जेवणाची ऑर्डर करणं चांगलंच महागात पडलं आहे.

आकांक्षा म्हणाली, अलीकडेच मी ऑनलाईन जेवणं ऑर्डर केलं होतं. त्यावेळी मला कंपनीचा कॉल आला. ज्यात मला समोरच्या व्यक्तीने माझी ऑर्डरबद्दल विचारत माझ्या नंबरवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं.

मी त्याला विचारलं असं का? त्यावर तो म्हणाला, हा नवा प्रोटोकॉल आहे. जसं मी त्या लिंकवर क्लिक केलं तर माझ्या अकाऊंटमधून पाच ते दहा मिनिटाच्या फरकाने १० हजार तीनवेळा कट झाले.

अभिनेत्री पुढे म्हणाली, "मी फक्त विचार करत होतो की काय होत आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असं होतं हे माझ्या लक्षात येताच मी लगेच माझ्या बँकेत कॉल केला.

माझे खाते ब्लॉक झाले. पण तेव्हा माझे ३०,००० रुपये गमावले होते. कष्टाने कमावलेले पैसे असे गेल्यावर खूप त्रास होतो..."

आकांक्षाने तिला आलेल्या अनुभवानंतर लोकांना ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहण्याचं आवाहन केलं. कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका कारण आजकाल फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की ते तुम्हाला सहज फसवू शकतात..असं ती म्हणाली.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आकांक्षाने 'बडे अच्छे लगते हैं', 'हमारी बेटी राज करेगी', 'दिल से दी दुआ सौभाग्यवती भव' आणि 'साथ निभाना साथिया 2' मध्ये काम केले आहे. सध्या आकांक्षा झी टीव्हीवरील 'कुंडली भाग्य' या मालिकेत निधीच्या भूमिकेत दिसत आहे.