४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:21 IST2025-07-29T10:59:31+5:302025-07-29T11:21:50+5:30

Ponnambalam : दारूच्या व्यसनामुळे त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. किडनी फेल झाल्यामुळे तो आता अंथरुणाला खिळला आहे.

काही स्टार्स असे आहेत ज्यांनी एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य केलं. पण नंतर परिस्थिती अशी झाली की आज ते वाईट काळातून जात आहेत. असाच एक प्रसिद्ध अभिनेता आहे ज्याने चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केलं. तो खूप लोकप्रिय झाला.

पोन्नम्बलम असं या अभिनेत्याचं नाव असून तो अत्यंत वाईट काळातून जात आहे. दारूच्या व्यसनामुळे त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. किडनी फेल झाल्यामुळे तो आता अंथरुणाला खिळला आहे.

अभिनेता पोन्नम्बलमने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे. तमिळ चित्रपटांसोबतच तो मल्याळम आणि हिंदीमध्येही काम करताना दिसला. त्याने १९८८ मध्ये प्रभुच्या 'कलियुगम' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

'अपूर्व सहधरंगल', 'वेत्री विझा', 'मिचल मदन कामराजन' आणि 'मननगर कवल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय करून त्याने आपली छाप पाडली. सुनील शेट्टीच्या 'रक्षक' आणि अनिल कपूरच्या 'नायक'मध्येही काम केलं .

पोन्नम्बलमने चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणूनही काम केलं. तो इतका परफेक्ट होता की, स्टंट करताना त्याला कोणतीही दुखापत किंवा फ्रॅक्चर झालं नाही, ज्यामुळे त्याला "स्पेअर पार्ट्स" हे टोपणनाव मिळालं.

सरथ कुमार यांच्या 'नादमाई', 'कुली' आणि रजनीकांत यांच्या 'मुथु' या चित्रपटातील त्याच्या खलनायकी भूमिकांनी खूप प्रसिद्धी मिळवून दिली. पोन्नम्बलम याने १९९९ मध्ये १० चित्रपटांमध्ये काम केलं. रजनीकांत, कमल, अजित, विजय, सत्यराज आणि विजयकांत सारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आणि हिंदीमध्ये नाव कमावलं.

तमिळ व्यतिरिक्त या अभिनेत्याने तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पोन्नम्बलम शेवटचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कटेरी' चित्रपटात दिसला होता. गंभीर आजारावर उपचार घेत असल्याने तो कॅमेऱ्यासमोर आला नाही.

उपचारांबद्दल बोलताना पोन्नम्बलम म्हणाला होता की, "मी रुग्णालयात असताना, माझ्या उपचारांसाठी मला आर्थिक मदत करणारे सरथ कुमार होते. त्यानंतर काही इतर लोकांनीही मदत केली. आर्थिक समस्या असताना धनुषने मला मदत केली. घरावर संकट आलं तेव्हा अभिनेता अर्जुननेही मला मदत केली."

"डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, मी फक्त एक वर्ष जगू शकेन. डायलिसिस ही जगातील सर्वात क्रूर शिक्षा आहे. मला एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी इंजेक्शन घ्यावे लागतात. गेल्या चार वर्षांपासून मी एकाच ठिकाणी ७५० इंजेक्शन्स घेतली आहेत. हे खूप कठीण आहे. "

"मी मीठ असलेलं अन्न खाऊ शकत नाही. मी पोटभर जेवू शकत नाही. माझ्या शत्रूंचीही अशी अवस्था होऊ नये. माझ्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. पण आतापर्यंत मी माझ्या कुटुंबाला रुग्णालयात बोलावलेले नाही. मी घरी एकटाच आहे."

"मी आतापर्यंत माझ्या उपचारांवर ३५ लाख रुपये खर्च केले आहेत. अभिनेता चिरंजीवीने मला पैसे देऊन मदत केली. पण अनेक कलाकारांनी मी कसं जगतोय हे विचारलं देखील नाही. एकदा शूटिंग दरम्यान माझं चिरंजीवीशी भांडण झालं. पण त्याने सर्व काही विसरून मला मदत केली."