हैदराबादमधील मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी लग्न करतोय प्रभास ? टीमने जारी केलं निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:56 IST2025-03-27T17:27:04+5:302025-03-27T17:56:27+5:30
प्रभासच्या कुटुंबाने त्याच्यासाठी वधू शोधल्याची चर्चा आहे.

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास कधी लग्न करणार, कोणाशी लग्न करणार या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चाहते फार काळापासून प्रतीक्षा करत आहेत.

आता पुन्हा एकदा प्रभासच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

प्रभास हा हैदराबादमधील एका उद्योगपतीच्या मुलीसोबत अरेंज मॅरेज लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

तेलुगू न्यूज १८ च्या वृत्तानुसार, प्रभासचे दिवंगत अभिनेता-राजकारणी काका कृष्णम राजू यांची पत्नी श्यामला देवी लग्नाची सर्व तयारी पाहत असल्याचा दावाही करण्यात येतोय.

इंडिया टुडे डिजिटलसोबत बोलताना या बातम्यांवर अभिनेत्याच्या टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. "ही पूर्णपणे खोटी बातमी आहे. दुर्लक्ष करा", असं टीमनं म्हटलं आहे.

प्रभासच्या लग्नाबाबत चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हैदराबादमध्ये कल्की 2898 एडी कार्यक्रमादरम्यान प्रभासने अशा अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, 'मी लवकरच लग्न करणार नाही. कारण मला माझ्या महिला चाहत्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत.

प्रभासचे नाव अनुष्का शेट्टी सोबत अनेकदा जोडलं गेलं आहे. दोघे लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं.

अनुष्का शेट्टीशिवाय, प्रभासचं नाव क्रिती सनॉनसोबतही जोडलं गेलं होतं. 'आदिपुरुष'च्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं, अशी चर्चा होती.

प्रभासच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच 'राजा साहेब' आणि 'फौजी'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो लवकरच 'स्पिरिट' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

















