कोणी भांडी घासून तर कोणी दूध विकून केला उदरनिर्वाह, मराठी कलाविश्वातील 'या' अभिनेत्रींनी केलाय स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:00 AM2022-05-06T07:00:00+5:302022-05-06T07:00:02+5:30

Marathi actress: आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींनी एकेकाळी प्रचंड संघर्ष केला आहे. त्यानंतर आज त्या यश उपभोगत आहेत.

सुप्रिया पाठारे- आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या सुप्रियाने बालपणापासूनच कष्ट करण्यास सुरुवात केली.

सुप्रियाने लहान असताना लोकांच्या घरी धुणी भांडी केली आहेत. नृत्याचं प्रशिक्षण घेता यावं यासाठी तिने मैत्रिणीकडे धुणी भांडी केली होती. त्यातून मिळणाऱ्या पैशात त्यांनी डान्स क्लासचे पैसे भरले होते.

अर्चना नेवरेकर - सुप्रिया पाठारे यांची धाकटी बहीण म्हणजे अर्चना नेवरेकर. सुप्रियाप्रमाणेच आज त्या लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती म्हणून ओळखल्या जातात.

लहान असताना सुप्रियाप्रमाणेच त्यांनीही कष्ट केले आहेत. त्या कष्टातून पुढे येत आज मराठी कलाविश्वात त्यांनी हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सिया पाटील- सिया पाटील हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. 'झक मारली बायको केली', 'कॅश करुनी अॅश करू', 'चल गंमत करू', 'नवरा माझ्या बायकोचा', 'भागम भाग', 'अपना सपना बोंबाबोंब', 'बाप रे बाप', मोहन आवटे, धूम टू धमाल, पक्याभाई अशा कितीतरी चित्रपटात ती झळकली आहे.

सियाने मराठी कलाविश्वात जरी स्थान निर्माण केलं असलं तरी तिचा हा प्रवास सोपा नव्हता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने हे यश मिळवलं आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील राजेवाडी येथे एका शेतकरी कुटुंबात सियाचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ती दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायची. त्यानंतर संध्याकाळी २ तास पेट्रोल पंप व फूडवर्डवर जाऊन अकाऊंटचे काम पाहायची.

नेहा खान- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नेहा खान. शिकारी या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. याशिवाय तिने काळे धंदे या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना असलेल्या नेहाने एकेकाळी प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिने अनेकांच्या घरी धुणी-भांडी केली आहेत. इतकंच नाही तर म्हशीचं दूध काढून ते विकलं देखील आहे. एका मुलाखतीत तिने या गोष्टींचा खुलासा केला होता.