लिव्ह इन रिलेशनशिपवर प्रिया-उमेशने व्यक्त केलं मत, लग्नसंस्थेवर भाष्य करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:20 IST2025-09-09T14:02:41+5:302025-09-09T14:20:06+5:30
आजकालची पिढी उथळ आहे, ते वरवरचा विचार करतात असं म्हटलं जातं. पण...

अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमा प्रदर्शित होत आहे. ही लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित गोष्ट असेल असा अनेकांनी अंदाज लावला आहे.
खऱ्या आयुष्यात प्रिया आणि उमेशच्या लग्नाला १४ वर्ष झाली आहेत. लग्नसंस्था, लिव्ह इन रिलेशनशिप, सिच्युएशनशिप याबाबतीत त्यांचे विचार काय यावर नुकतंच त्यांनी भाष्य केलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत उमेश कामत म्हणाला, " आम्ही लग्न केलं म्हणजे आमचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. जर आमचा विश्वास नसता तर नसतंही केलं. पण ज्यांचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही त्यांना मी जजही करत नाही."
"माझ्या नशिबाने मला चांगली मुलगी मिळाली प्रत्येकाला मिळेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं असू शकतं."
"मला वाटतं लग्न म्हणजे मजा असते. भांडणं वगैरे असतात. लग्नसंस्था खूप छान गोष्ट आहे. आम्ही ती एन्जॉय करतोय. ज्यांना काही वेगळे अनुभव आले असतील किंवा ज्यांचा लग्नसंस्थेवरुन विश्वास उडाला असेल तरी मी त्यांना जज करणार नाही. प्रत्येकाचा तो वैयक्तिक निर्णय आहे."
"आजकालची पिढी उथळ आहे, ते वरवरचा विचार करतात असं म्हटलं जातं. पण मला वाटतं अगदीच तसं नसेल. प्रत्येक जण त्याच दृष्टीने विचार करतो असं मला वाटत नाही."
"बिन लग्नाची गोष्ट चा टीझर आल्यानंतर याच पिढीच्या अनेकांनी पाठिंबा दिला. अनेकजण विरुद्धही बोलले. तर मला वाटतं पिढी नाही तर प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा विचार असेल."
"कदाचित आज जे लिव्ह इन च्या बाजूने आहेत चार वर्षांनी त्यांना वेगळंही वाटेल. दुरुन डोंगर साजरे असं म्हणतात तसंच ते आहे. पण मी कोणाला जज करत नाही."
तर प्रिया बापट म्हणाली, "मला वाटतं जगा आणि जगू द्या. ज्याला जसं जगायचंय तसं त्यांना जगू द्या. आपण कोणत्याही नात्याच्या व्याख्या दुसऱ्यावर लादून ती नाती सुखी होत नसतात. सिच्युएशनशिप ही त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असते. पुढे त्याचं काय होईल हे त्यांच्यावरच आहे."