'या' मराठी अभिनेत्रींचा स्वॅग काही कमी नाही! साऊथमध्येही गाजवलाय अभिनयाचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:36 PM2023-08-10T15:36:30+5:302023-08-10T15:41:47+5:30

अनेक मराठी अभिनेत्रींनी साऊथमधून पदार्पण केलंय.

मराठमोळ्या अभिनेत्री कशातही कमी नाहीत अनेकदा सिद्ध झालं आहे. मराठमोळ्या अभिनेत्रींच्या टॅलेंटची दखल जशी बॉलिवूडने घेतलीये तसंच साऊथ इंडस्ट्रीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सई ताम्हणकर ते भाग्यश्री मोटे अशा अनेक अभिनेत्रींनी साऊथमध्ये डंका गाजवला आहे.

कित्येक वर्ष मराठी नाटक असो किंवा सिनेमा आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात सक्रिय असते. सोनालीची 'दिल चाहता है' मधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोनालीने कन्नड, तमिळ आणि गुजराती या भाषांमध्येही काम केलं आहे. वयाच्या १८ व्या वर्षी तिने गिरीश कर्नाड यांच्या 'चेलुवी' या कन्नड सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. त्याच वर्षी तिने तमिळ सिनेमा 'मे मधम' मध्ये काम केले.

मराठीतील बोल्ड अँड बिन्धास्त अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या हिंदी सिनेसृष्टीतही आपला पाय रोवून आहे. 'मिमी' सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. हिंदीत जम बसवण्याआधी सईने दाक्षिणात्य सिनेमातही काम केलं आहे. 2017 साली आलेल्या 'सोलो' सिनेमा सईने भूमिका केली होती. या सिनेमात दुलकर सलमानसोबत तिने स्क्रीनशेअर केली होती.

अभिनेत्री नेहा पेंडसेने बालकलाकार म्हणूनच अभिनयाला सुरुवात केली होती. 1999 साली आलेल्या 'प्यार कोई खेल नही' सिनेमातून पदार्पण केले होते. नेहाने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केलं. तिची 'मे आय कम इन मॅडम' मालिका खूप गाजली. याशिवाय ती दाक्षिणात्यसृष्टीतही अॅक्टिव्ह होती. तिने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये काम केलं आहे. सौम्या, मुमताज,पोडरिल्लु या तेलुगू तर महालक्ष्मी, ममथी या तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे.

'राधा ही बावरी' मालिकेतून आपल्या गोड अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुतीला मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'राधा ही बावरी' मालिका २०१२ साली प्रदर्शित झाली होती. मात्र तिने 2009 सालीच 'इंदिरा विझा' या तमिळ रोमँटिक थ्रिलरमध्ये भूमिका साकारली आहे.

मृणाल ठाकूर हे नाव तर हिंदीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणाल मूळची धुळ्याची असून तिने मराठमोळ्या कुटुंबात तिचा जन्म झाला.'विटी दांडू' या मराठी सिनेमात तिने काम केलं. तर मृणालला खरी लोकप्रियता मिळाली ती दाक्षिणात्य सिनेमा 'सीतारामम' मधून. या सिनेमात तिची आणि दुलकर सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. याशिवाय मृणालने 'हाय नन्ना' आणि 'वीडी 13' या तेलुगू सिनेमांमध्ये काम केले आहे.

'देवयानी' मालिकेतून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सिनेसृष्टीत फारशी दिसत नाही. तिने 'देवो के देव महादेव' आणि 'सिया के राम' या हिंदी मालिकांमध्येही काम केले. पण भाग्यश्रीने साऊथमध्येही काम केलं आहे. 2019 साली 'चिकाटी गडिलो चिथाकोटुडू' या तेलुगू सिनेमात काम केलं.

याशिवाय मराठीतील अप्सरा म्हणजेच छोटी सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम सिनेमात पदार्पण करत आहे. पहिल्यांदाच ती वेगळ्या भाषेतील सिनेमा करत आहे. सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत तिला काम करण्याची संधी मिळाली आहे. 'मलाईकोट्टई वालिबन' असं सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं शूट राजस्थानमध्ये झालंय.