संजय दत्त जेव्हा भडकतो...प्रार्थना बेहेरेने सांगितला किस्सा, म्हणाली, "मुलगी होते म्हणून वाचले..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 02:12 PM2023-09-24T14:12:14+5:302023-09-24T14:22:32+5:30

प्रार्थनाने लग्नानंतर काम मिळणं बंद झाल्याचाही खुलासा केला. म्हणाली, 'मी जाड...'

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयनाने सर्वांनाच प्रेमात पाडले. प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. हिंदीतील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता' पासून आपण तिला बघितलं आहे. याच मालिकेतून तिची अभिनय क्षेत्रात सुरुवात झाली.

प्रार्थनाने अनेक मराठी मालिका आणि सिनेमात काम केलं. नुकतीच तिची 'माझी तुझी रेशिमगाठ' मालिका खूप गाजली. श्रेयस तळपदे सोबत तिची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. याआधी तिने २०१७ मध्ये 'लव्ह लग्न लोचा' ही मालिका केली होती.

प्रार्थनाला अनेक मराठी सिनेमात आपण पाहिलंच आहे. 'कॉफी आणि बरंच काही','मितवा','मिस्टर अँड मिसेस सदाचारी','व्हॉट्सअॅप लग्न','जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' हे तिचे काहीही गाजलेले चित्रपट.

पण तुम्हाला माहितीये का प्रार्थना अभिनेत्री होण्याच्या आधी पत्रकार होती. होय ती एका वृत्तवाहिनीत मनोरंजन, फिल्मीच्या बातम्या कव्हर करायची. हे तिच्या करिअरची सुरुवात होती. प्रार्थना तेव्हा सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायची. तसंच वादग्रस्त प्रश्न ती बिंन्धास्त विचारायची. त्यामुळे कोणत्याही वादग्रस्त प्रश्नांची मुलाखत असेल तर तिच्या ऑफिसमधून सर प्रार्थनालाच पाठवायचे.

पत्रकारिता करतानाचा एक मजेशीर किस्सा प्रार्थनाने नुकताच शेअर केला. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना म्हणाली,'मी न्यूज चॅनललामध्ये काम करत असताना एकदा संजय दत्तचा मार खाता खाता वाचले होते. झालं असं की आमच्या सरांना असं कळलं होतं की संजय दत्तने हातावर मान्यताचा टॅटू काढला आहे. संजय दत्त कुठे असेल हे बघ असं त्यांनी मला सांगितलं.'

मग मला कळलं की तो एका कॅन्सरसंबंधित कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. मी लगेच तिथे पोहोचले. आता कार्यक्रम कॅन्सरसंबंधित होता आणि मला मान्यताच्या टॅटूबद्दल प्रश्न विचारायचा होता. अशा ठिकाणी हा प्रश्न योग्य नाही असं मला वाटलं. पण सरांनी विचारायलाच लावला होता.'

संजय दत्त येणार त्याठिकाणी मी उभी होते. कॅमेरा आणि बूम पाहून तोही मला बाईट देण्यासाठी आला. मी त्याला टॅटूबद्दल प्रश्न विचारताच तो असा काही चिडला की बास...मी मुलगी म्हणून वाचले नाहीतर त्याने मला मारलंच असतं.

त्याने उत्तर न देता रागाने कॅमेऱ्यावर हात मारला आणि तो निघून गेला. मी सरांना जे घडलं ते सांगितलं. तर सर म्हणाले, ठिके आपल्याला बातमी तर मिळाली ना की उत्तर न देता त्याने चिडून कॅमेऱ्यावर हात मारला. दोन तीन दिवस ती बातमी चालत होती.

याच मुलाखतीत प्रार्थनाने लग्नानंतर काम मिळत नसल्याचीही खंत व्यक्त केली. लग्नानंतर प्रार्थना ४५ दिवस फिरायला गेली होती. यानंतर तिचं वजन खूप वाढलं होतं. तिला काम मिळत नव्हतं. तिने आत्मपरिक्षण केलं. नवरा निर्माता असल्याने ती त्याच्याचसोबत काम करेल असा लोकांना गैरसमज झाल्याचंही ती म्हणाली.

मात्र आता प्रार्थना पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याचं कळतंय. अद्याप तिने याबाबत चाहत्यांसमोर काहीही सांगितलेलं नाही. मात्र तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.