Good Bye 2023 : सरत्या वर्षात हरपले मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे झगमगते तारे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:38 PM2023-12-25T12:38:10+5:302023-12-25T12:43:54+5:30

Good Bye 2023 : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. सरते वर्ष म्हणजेच २०२३ हे वर्ष मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी समाधानाचे होते. पण या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या काही कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. यातील काही जणांचे वयोमानामुळे तर काहींचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार...

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. सरते वर्ष म्हणजेच २०२३ हे वर्ष मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी समाधानाचे होते. पण या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या काही कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. यातील काही जणांचे वयोमानामुळे तर काहींचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार...

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे १८ मार्च रोजी वयाच्या ८८व्या वर्षी अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झाले. पिंजरा आणि माहेरची साडी अशा हिट चित्रपटात काम केले होते. त्यांनी ३०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. काही हिंदी चित्रपटातून ते झळकले होते.

सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांनी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. ४ जून रोजी दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सात दशकांच्या प्रवासात त्यांनी ५००हून जास्त चित्रपटांत काम केले होते. मराठीच नव्हे तर, हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.

दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २३ जून रोजी आकस्मिक निधन झाले. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते. प्रवीण कारळे यांनी बोकड, भैरू पैलवान की जय, मानसन्मान, माझी आशिकी, हृदयात समथिंग समथिंग हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॅण्डसम हिरो म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी ते ७७ वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह मावळ तालुक्यातील आंबीमध्ये एका बंद खोलीत मृतदेह आढळला आणि खळबळ उडाली होती. रवींद्र महाजनी यांनी १९७५ ते १९९० या काळात मराठी सिनेइंडस्ट्रीवर स्वतःचा ठसा उमटवला. शेवटच्या काळात रवींद्र महाजनी त्यांच्या कुटूंबापासून दूर राहत होते.

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांनी वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी काम केले. अपराध मीच केला या नाटकातील त्यांनी साकारलेला गोळे मास्तर, ‘अपूर्णांक’मधील ब्रह्मे, ‘अलिबाबा चाळीस चोर’मधील खुदाबक्ष, ‘एकच प्याला’मधील तळीराम, ‘तुझे आहे तुझं पाशी’मधील आचार्य या भूमिका खूप गाजल्या. शेवटच्या काळात ते आजारी होते. २४ जुलै २०२३ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्ट, २०२३ रोजी त्यांच्याच कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. गोविंद निहालानींच्या ‘तमस’ या चित्रपटापासून कलादिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. लगान, देवदास, जोधा-अकबर, 1942 लवस्टोरी, मिशन कश्मीर, परिंदा, अजिंठा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व या चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केले.

हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेवटच्या काळात त्या अल्झायमरने ग्रस्त होत्या आणि वयोमानानुसार त्या आजारीही होत्या.

अभिनेता मिलिंद सफई यांचे २५ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ५३व्या वर्षी त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मराठी चित्रपट आणि मालिकांतून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, मेकअप, पोस्टर बॉईज अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. पुढचं पाऊल, सांग तू आहेस का?, आई कुठे काय करते, 100 डेज या मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

ज्येष्ठ अभिनते रवींद्र बेर्डे यांनी १३ डिसेंबरला वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी एक्झिट घेतली. १९६५ साली सर्वात प्रथम रंगभूमीवर पदार्पण केलेल्या बेर्डेंनी ३००हून जास्त मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. काही हिंदी चित्रपटांमध्येही ते झळकले.