गौरव मोरेने खरंच लग्न केलं की नाही? पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "काही गोष्टी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:07 IST2026-04-11T11:38:06+5:302026-04-11T12:07:34+5:30
घर तर घेतलं, पण लग्न केलंय की नाही? गौरव मोरेचं उत्तर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने नुकत्याच दोन गुडन्यूज दिल्या. एक म्हणजे त्याचं पवईत हक्काचं घर झालं. काही दिवसांपूर्वीच त्याने घराची झलक सर्वांना दाखवली.

तर दुसरं म्हणजे गौरवने लग्न केल्याच्या चर्चा झाल्या. प्रियंका कारेकरशी गौरवचं कधीच लग्न झालं असा मोठा खुलासा झाला. अभिनेत्री ऋतुजा बागवेने दोघांसोबत फोटो शेअर करत 'मिस्टर अँड मिसेस मोरे' असं लिहिलं होतं.

दरम्यान गौरवने सर्वांना नवीन घराची बातमी दिली. मात्र लग्न झाल्याच्या चर्चांवर तो काहीच बोलला नव्हता. त्यामुळे त्याने खरंच लग्न केलं आहे की नाही असा संभ्रम अजूनही चाहत्यांमध्ये आहे. त्यातच आता त्याने पहिल्यांदाच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

गौरवने त्याच्या आगामी सिनेमा 'आउट ऑफ सिलॅबस'च्या प्रमोनशवेळी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत नवीन घराबद्दल आणि लग्नाच्या चर्चांवर भाष्य केलं. तो म्हणाला, "घर घेतल्याचा आनंद शब्दात न सांगता येणारा आहे. घरात दोन बाल्कनी आहेत. मला आता तिथेच बसून राहावं वाटतं."

तर लग्नाच्या चर्चांवर तो म्हणाला, "काही गोष्टी गुपित ठेवलेल्याच चांगल्या. अजून मी ऑफिशियल घोषणा केलेली नाही. वेळ येईल तेव्हा बाहेर आणेनच."

विशेष म्हणजे अभिनेता पॅडीलाही गौरवच्या बायकोबद्दल माहित होतं. तो म्हणाला, "गौरवची मैत्रीण आहे हे मला माहित होतं. आम्ही आताच स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा ती त्याला सोडायला विमानतळावर आली होती."

"पण त्याने तोवर कोणालाही सांगितलं नव्हतं म्हणून मीही विचारलं नाही. जोवर काहीठरत नाही तोवर कोणाला सांगूही नये त्यामुळे त्याने चांगलंच केलं."

















