Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:25 IST2025-12-03T14:12:21+5:302025-12-03T14:25:12+5:30

Pawandeep Rajan : पवनदीप राजन अलीकडेच सलीम-सुलेमानच्या पॉडकास्टवर दिसला, जिथे त्याने पहिल्यांदाच त्याच्या अपघाताबद्दल सांगितलं.

इंडियन आयडल १२ विजेता पवनदीप राजनच्या कारचा ५ मे रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबादजवळ एका मोठा अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि बरं होण्यासाठी अनेक महिने लागले.

पवनदीप राजन अलीकडेच सलीम-सुलेमानच्या पॉडकास्टवर दिसला, जिथे त्याने पहिल्यांदाच त्याच्या अपघाताबद्दल सांगितलं. तो एका शोवरून परतत असताना कारचा भीषण अपघात झाला.

पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलं की, त्याला एक शो मिळाला होता. तो दिवसा निघणार होता, पण तो संध्याकाळी निघाला. रात्री ३ वाजले होते आणि गायक झोपला होता. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा अपघात झाला होता.

पवनदीपने पुढे सांगितलं की, ड्रायव्हरला झोप लागली होती, ज्यामुळे त्याची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. सिंगर म्हणाला की, त्याच्या कारचा दरवाजा उघडत नव्हता. फक्त त्याचा एक हात काम करत होता. तो वेदनेने कण्हत होता.

लोकांकडे मदत मागत होता, पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. त्याच्या कारला आग लागली आणि तो आत अडकला. पोलीस येईपर्यंत कोणीही त्याला वाचवलं नाही. त्यानंतर त्याला कारमधून बाहेर काढण्यात आलं.

पवनदीप पुढे म्हणाला की, "मला रुग्णालयात नेण्यात आलं. माझे दोन्ही पाय आणि एक हात तुटला. मी घरी फोन करून माझ्या कुटुंबाला बोलावलं."

"मी फक्त लवकरात लवकर उपचार घेण्याचा विचार करत होतो. आता सर्व काही ठीक आहे. एक महिना मी डावीकडून उजवीकडे हलूही शकत नव्हतो."

"आता मी थोडं चालू शकतो, म्हणून मी आनंदी आहे. तेव्हाच मला चालण्याचे महत्त्व कळले. जर अपघात झाला तर शक्य तितक्या लवकर बरे होण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा आणि ते जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारा."

पवनदीप बेडरेस्टवर होता, नंतर त्याच स्थितीत मुंबईला परतला. नंतर हळूहळू पुन्हा चालायला लागला. त्याने हळूहळू पुन्हा गिटार वाजवायला सुरुवात केली आहे. त्याचा हातही काहीसा बरा झाला आहे.