CAA आंदोलनात झाली भेट, नंतर पडली प्रेमात; कोण आहे स्वरा भास्करचा पती फहाद अहमद?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:19 AM2023-02-17T11:19:38+5:302023-02-17T11:35:30+5:30

स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विद्यार्थी तो समाजवादी पार्टीचा युवा नेता.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने गुपचुप लग्नगाठ बांधत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. समाजवादी पक्षाचा युवा नेता फहाद जिरार अहमद याच्याशी तिने लग्नगाठ बांधली.

सीएए एनआरसी आंदोलनावेळी दोघांची भेट झाली होती. आंदोलनानिमित्ताने अनेकदा ते संपर्कात येत होते.मात्र त्यांची खरी मैत्री होण्यामागचे कारण म्हणजे मांजर. दोघांकडेही मांजर असल्याने ते एकमेकांना फोटो शेअर करायचे तर अनेकदा व्हिडिओ कॉलही करायचे. यातूनच त्यांच्यात प्रेम बहरले.

फहाद हा स्वरापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. त्याचा जन्म उत्तर प्रदेशमधील बहेरी येथे झाला आहे. अलिगढ युनिव्हर्सिटीतून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मुंबई्च्या 'टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस'मधून त्याने एमफिल केले.

विद्यार्थी नेता म्हणून फहाद राजकारणात आला. समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेचा तो अध्यक्ष बनला. सीएए एनआरसी आंदोनलादरम्यान तो चर्चेत आला. आंदोलनात पक्षाकडून त्याने बरेच काम केले.

जुलै २०२१ मध्ये फहाद समाजवादी पार्टीत आला. तसेच त्याने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या फहाद समाजवादी पार्टीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे.

दुसरीकडे स्वरा भास्करही सीएए एनआरसी आंदोलनादरम्यान प्रचंड सक्रिय होती.तसेच तिने नेपोटिझम, जेएनयू वाद, इतर राजकीय विषयांवर परखडपणे मत मांडलं आहे. यातून अनेकदा ती ट्रोलही झाली आहे.

दोघांनी ६ जानेवारीलाच कोर्ट मॅरेज केलं आहे. काल तिने सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली.