सलमान खाननं नौसैनिकांसोबत फडकवला तिरंगा, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:08 PM2022-08-13T13:08:37+5:302022-08-13T13:10:01+5:30

चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्यावर रुपेरी पडद्यावरील सर्वच तारे जमिनीवर अवतरून प्रमोशन करण्यात बिझी होतात, पण काही कलाकार मात्र विशेष क्षणांचं महत्त्व जपत इतरांचं मनोबल उंचावण्याचं काम करतात. सलमान खानही अशाच कलाकारांपैकी एक आहे.

डोळ्यांत तेल घालून देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्याचं काम भारतीय नौसेना अविरतपणे करत आहे. कुटुंबियांपासून दूर राहून सीमांचं रक्षण करण्यासाठी तैनात असणाऱ्या नौसैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी सलमाननं त्यांच्यासोबत भारतीय तिरंगा फडकवला.

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत त्यानं विशाखापट्टणममधील सैनिकांसोबत जहाजावर वेळ घालवला.

सलमानला पाहून सैनिक खूपच उत्साहित आणि आनंदी झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता.

या दौऱ्यात सलमाननं सैनिकांशी बातचित करत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सैनिकांसोबत पुशअप्स केले.

इतकंच नव्हे तर जहाजावरील किचनमध्ये जाऊन जेवण बनवण्याची प्रक्रियाही समजून घेतली. सैनिकांना ऑटोग्राफ देऊन त्यांच्यासोबत भारतीय तिरंगा फडकवला.