Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:36 IST2025-10-09T14:26:08+5:302025-10-09T14:36:50+5:30
Saif Ali Khan : रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सैफला पाहून तैमूरने एक प्रश्न विचारला होता.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर अभिनेत्याला तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोराने सैफवर सहा वेळा वार केला. सैफवर दोन सर्जरी करण्यात आल्या. या सर्जरीसाठी सहा तास लागले.
ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या "टू मच" या शोमध्ये सैफ सहभागी झाला होता. तब्बल ८ महिन्यांनी पहिल्यांदाच अभिनेत्याने त्या रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे.
हल्लेखोराने पाठीत वार केल्याने सैफ जखमी झाला होता. त्यावेळी करीनाने ताबडतोब रुग्णालयात जाण्यास सांगितलं. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला होता. याच दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सैफला पाहून तैमूरने एक प्रश्न विचारला होता.
“तैमूरने मला विचारलं, ‘तू मरणार आहेस का?’ मी म्हणालो, ‘मला तसं वाटत नाही, पण माझी पाठ दुखते.’ करिना मुलांना लोलो (करिश्मा कपूर) च्या घरी घेऊन जाणार होती. आम्ही एक रिक्षा थांबवली. तेव्हा तैमूर म्हणाला की, तो माझ्यासोबत येईल.”
“मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा कर्मचारी झोपेत होते. मी म्हणालो, स्ट्रेचर मिळेल का?’ कर्मचारी म्हणाला, ‘व्हीलचेअर?’ मी म्हणालो, ‘नाही, मला स्ट्रेचरची गरज आहे.’ मी म्हणालो, ‘मी सैफ अली खान आहे आणि मला मेडिकल इमर्जेन्सी आहे” असं अभिनेत्याने सांगितलं.
जेव्हा सैफ हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसला, तेव्हा लोकांनी विचारलं की तो इतक्या गंभीर दुखापतींसह कसा चालू शकला. सैफ म्हणाला, "जेव्हा सगळं संपलं, तेव्हा खूप सल्ले आले - बाहेर कसं जायचं, काय बोलायचं. मीडिया खूप उत्सुक होती.
"घटना खूप वाईट होती, पण मी चालू शकत होतो. मला टाके पडले होते. चालणं वेदनादायक होतं, पण शक्य होतं, म्हणून मला व्हीलचेअरची गरज नव्हती" असं सैफ अली खानने म्हटलं आहे.
"त्या रात्री करिना बाहेर गेली होती आणि मी मुलांसोबत (तैमूर आणि जेह) चित्रपट पाहून परत आलो होतो. आम्ही पहाटे २ वाजता झोपायला गेलो. करिना परत आली तेव्हा आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर पुन्हा झोपी गेलो."
"मोलकरीण आत आली आणि म्हणाली, जेहच्या खोलीत कोणीतरी आहे. त्याच्या हातात चाकू आहे आणि त्याला पैसे हवेत असं म्हणत आहे. मी हे ऐकले आणि लगेच बेडवरून उठलो. मी जेहच्या खोलीत गेलो - अंधार होता आणि मला बेडवर एक माणूस चाकू घेऊन उभा असलेला दिसला."
"तो इतका हालचाल करत होता की, जेह आणि नॅनी दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. मला वाटलं, तो माझ्यापेक्षा बारीक आहे, मी त्याला हाताळू शकतो. म्हणून मी त्याच्यावर उडी मारली. पण हल्लेखोर चिडला. त्याच्याकडे दोन चाकू होते आणि तो सर्वत्र वार करू लागला."
"मी माझं ट्रेनिंग आठवण्याचा प्रयत्न केला आणि काही हल्ले रोखले. पण नंतर माझ्या पाठीवर जोरदार वार केला. तोपर्यंत घरातील इतर लोक बाहेर आले होते. आमची मोलकरीण गीता मदतीला आली आणि हल्लेखोराला माझ्यापासून वेगळे केलं. तिने माझा जीव वाचवला" अशी माहितीही अभिनेत्याने दिली आहे.