कपडे शिवणारा तरुण आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार; एका सिनेमासाठी चार्ज करतो ३ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 04:15 PM2024-01-18T16:15:17+5:302024-01-18T16:19:37+5:30

Bollywood actor: अभिनेत्याने दोन लग्न केले असून त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तो पार कोलमडून गेला होता.

बॉलिवूडमध्ये आज असे अनेक कलाकार पाहायला मिळतात ज्यांनी अथक मेहनत, कष्ट करुन इंडस्ट्रीत त्यांचं नाव कमावलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे राजपाल यादव.

राजपाल यादव याने आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे तो कायम इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असतो.

लोकप्रिय असलेल्या राजपाल यादव याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याने सुरुवातीच्या काळात बराच मोठा संघर्ष केला आहे. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगल काळावर भाष्य केलं.

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे राजपाल लहानाचा मोठा झाला. राजपालला आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं पण, उंची कमी असल्यामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्ण राहिली.

वयाच्या २० व्या वर्षी राजपाल यादवला टेलर म्हणून पहिली नोकरी मिळाली. त्याला नोकरी मिळाल्यामुळे घरातले चांगलेच खूश झाले होते.

टेलरिंग करत असताना त्याचं लग्न झालं. मात्र, पहिल्या बाळंतपणातच त्याच्या पत्नीचं निधन झालं. इतकंच नाही तर त्याची आणि त्याच्या पत्नीची शेवटी भेट सुद्धा झाली नाही. त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं.

टेलरची नोकरी करत असतानाच त्याने अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने शूल या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

आजवर राजपालने जंगल, हंगामा, भूलभुलैय्या, चुपचुपके,ढोल यांसारख्या जवळपास २०० सिनेमामध्ये काम केलं. राजपाल त्याच्या दमदार अभिनयामुळे ओळखला जातो. त्यामुळेच त्याला मानधन सुद्धा तितकंच दिलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार, राजपाल एका सिनेमासाठी २ ते ३ कोटी रुपये मानधन घेतो.