Monalisa : "मोनालिसा अल्पवयीन, २००९ मध्ये जन्म, मुद्दाम वाढवलं वय..."; काकांचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:30 IST2026-03-15T16:09:56+5:302026-03-15T16:30:51+5:30
Monalisa : मोनालिसाचे काका विजय सिंह भोसले यांनी एक खळबळजनक खुलासा केला. ज्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

मोनालिसा आणि फरमान खान यांच्या लग्नानंतर संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. मोनालिसाचे काका विजय सिंह भोसले यांनी एक खळबळजनक खुलासा केला. ज्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

जर मोनालिसाच्या जन्माबाबतचे हे तथ्य खरं ठरलं, तर निश्चितच अनेकांच्या अडचणी आपोआप वाढणार आहेत. मोनालिसाच्या लग्नानंतर ती सज्ञान (प्रौढ) असण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात तिला लाँच करणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा देखील याच विषयावरून महेश्वरला पोहोचले आहेत. "२०२५ मध्ये १६ वर्षांची असलेली मोनालिसा एका वर्षात १८ वर्षांची कशी झाली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून तिची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणीही केली आहे.

काका विजय सिंह भोसले यांनी चर्चेदरम्यान सांगितलं की, केरळला जाण्यापूर्वी मोनालिसा उज्जैनहून इंदूरच्या पासपोर्ट कार्यालयात गेली होती. आधार कार्डमधील काही त्रुटी किंवा गोंधळामुळे तिला महेश्वर पोलीस ठाण्यातून व्हेरिफिकेशन करून घेण्यास सांगण्यात आलं होतं.

याच कामासाठी ती इंदूरवरून थेट महेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचली होती. दुसऱ्या दिवशीचे तिकीट असल्याने वेळेअभावी ती घरी न येता पुन्हा इंदूरला निघून गेली.

महेश्वर पोलिसांनी विचारणा केली असता, तिने सांगितले की तिला शिक्षण घ्यायचं आहे आणि रील बनवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता केरळला जायचं आहे.

विजय भोसले म्हणाले की, "पासपोर्ट बनवण्यासाठी किंवा इतर कारणास्तव तिला १८ वर्षांची दाखवणं आवश्यक होतं, म्हणून तिचं वय मुद्दाम वाढवावं लागलं आणि कागदपत्रांमध्ये तसे नमूद करण्यात आलं.

"मोनालिसाचा जन्म बहुधा २००९ चा आहे. जर पासपोर्ट बनवण्याची गरज नसती किंवा तिचे वय १८ वर्षे दाखवलं नसतं, तर तिचं आता लग्नही झालं नसतं."

कुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाला एखाद्या मोठ्या कटात अडकवण्यात आलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. जर विजय भोसले यांचे म्हणणे खरे असेल, तर सनोज मिश्रा यांचा संशय सत्यात बदलू शकतो.

मोनालिसाच्या या निर्णयामुळे तिच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा अत्यंत संतापले आहेत. दिग्दर्शकाने या संदर्भात आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मिश्रा यांनी मोनालिसाच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हटलं आहे. "मोनालिसाला भडकवून, ज्या प्रकारे भोळ्या-भाबड्या बंजारा समाजाची फसवणूक करून PFI आणि कट्टरपंथी संघटनांनी केरळमध्ये नेऊन लव्ह जिहाद घडवून आणलं आहे."

"मोनालिसाचे वडील जयसिंह यांच्या मते मुलगी अल्पवयीन आहे. बनावट कागदपत्रं बनवून एका तासात लग्नाचं सर्टिफिकेट मिळणं, हे कट्टरपंथीयांचे नेटवर्क किती मजबूत आहे हे सिद्ध करतं" असं सनोज मिश्रा यांनी म्हटलं आहे.

















