नवऱ्यापेक्षा ७ वर्षांनी छोटी आहे जुही चावला, अभिनेत्रीने ६ वर्ष लपवून ठेवलेलं लग्न, काय होतं नेमकं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 11:58 AM2023-11-13T11:58:25+5:302023-11-13T12:22:12+5:30

एकेकाळी चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या जुही चावलाचा आज ५६वा वाढदिवस आहे.

९०च्या दशकातील आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुही चावला. 'इश्क', 'डर', 'कयामत से कयामत तक', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' अशा सुपरहिट चित्रपटांत काम करून जुही चावलाने अभिनयाचा ठसा उमटवला. एकेकाळी चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या जुही चावलाचा आज ५६वा वाढदिवस आहे.

१९८४ साली जुहीने मिस इंडिया हा खिताब नावावर केला होता. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. जुहीचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण, १९८८ साली प्रदर्शित झालेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमाने तिला रातोरात स्टार बनवलं. या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

एकीकडे बॉलिवूडमधील करिअर चांगलं सुरू असतानाच जुहीला वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. जुहीने १९९५ साली जय मेहता यांच्याबरोबर गुपचूप लग्न केलं.

पण, जुहीचं लग्न ठरल्यानंतर एका कार अपघातात तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या भावाला स्ट्रोक आल्याने चार वर्ष उपचार केल्यानंतर त्याचंही निधन झालं.

वैयक्तिक आयुष्यात अनेक प्रसंगांना तोंड दिल्यांनंतर जुहीने जय मेहता यांच्याबरोबर संसार थाटला. पण, लग्न केल्याचं तिने लपवून ठेवलं होतं. जुहीने पहिल्या प्रेग्नन्सीदरम्यान लग्न केल्याचं उघड केलं होतं.

लग्न लपवण्यामागचं कारण जुहीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. लग्नाची बातमी समजताच करिअरवर परिणाम होण्याची भीती जुहीला वाटत होती. म्हणून तिने लग्न लपवल्याचं सांगितलं होतं.

जुही चावला आणि जय मेहता यांची पहिली भेट राकेश रोशन यांनी घडवून आणली होती. १९९२ साली कारोबार सिनेमाच्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा जय यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं.

जुही आणि जय यांच्यातील मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीच्या निधनाच्या पाच वर्षांनी जय मेहता यांनी जुहीबरोबर लग्न केलं.

जुही चावला पती जय मेहता यांच्यापेक्षा सात वर्षांनी छोटी आहे. त्यांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत. जय मेहता हे एक व्यावसायिक आहेत.