“बंदूक लागून जखमा झाल्या”, गिरीजाने सांगितला ‘जवान’च्या शूटिंगचा अनुभव, म्हणाली, "डोकं आपटलं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:37 PM2023-09-07T18:37:37+5:302023-09-07T18:53:48+5:30

Jawan Movie : ‘जवान’ चित्रपटात शाहरुखबरोबर इतर सहा अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यातीलच एक भूमिका गिरीजा ओकने साकारली आहे.

बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ने सिनेइंडस्ट्रीत धमाका केला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘जवान’ अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या ‘जवान’ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘जवान’मधील शाहरुखचे लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.

शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही झळकली आहे. ‘जवान’ चित्रपटात शाहरुखबरोबर इतर सहा अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यातीलच एक भूमिका गिरीजा ओकने साकारली आहे.

गिरीजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘जवान’च्या शूटिंगचा अनुभव सांगितला. याबरोबरच तिने शाहरुख खानबरोबर काम करण्याबाबतही भाष्य केलं. गिरीजाने या चित्रपटात अनेक एक्शन सीन्स केले आहेत. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये याची झलक पाहायला मिळाली.

‘जवान’ चित्रपटातील हे एक्शन सीन्स शूट करण्याचा अनुभव गिरीजाने शेअर केला. ती म्हणाली, “आत्तापर्यंत कधीच न साकारलेली भूमिका मी यात साकारत आहे. ट्रेलरमध्ये माझी झलक पाहून तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल. अक्शन करताना मी यात दिसते आहे. हा माझ्यासाठी थ्रिलिंग अनुभव होता. याआधी कधीच न केलेलं सगळं मी या चित्रपटात केलं आहे.”

“मी या चित्रपटात अनेक अक्शन सीक्वेन्स केले आहेत. बंदूकांना बाहेर काही पार्ट्स असतात. चित्रपटातील बहुतांश भागात त्या बंदुका आम्ही खांद्याला अडकवून चालताना दिसतो. त्या बंदुकीला छोटसं लॅच होतं.”

“ते लॅच लागून मांडीला जखमा झाल्या होत्या. आमच्या सहा जणींच्या पायावर काळे निळे डाग पडले होते. कारण, हे आमच्या लगेच लक्षात आलं नाही. नंतर आम्हाला कळलं की सहाही जणींना अशा जखमा झाल्या आहेत.”

“एक्शन सीन शूट करताना पडझड झाली. डोक आपटलं...असं खूप काही झालं आहे. मी जेव्हा जवानची पहिली पोस्ट शेअर केली होती, तेव्हा ‘रक्त, घाम आणि अश्रू’ असं कॅप्शन लिहिलं होतं. आणि ते खरंच आहे. आम्ही सगळ्यांनीच या चित्रपटासाठी तेवढी मेहनत केली आहे,” असं म्हणत गिरीजाने जवानच्या शूटिंगचा अनुभव सांगितला.

‘जवान’ चित्रपटातील गिरीजाने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करण्याआधी गिरीजाने आमिर खानबरोबरही काम केलं आहे. तारे जमीन पर या चित्रपटात ती झळकली होती.

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे.