44 वर्षात सारख्याच नावाने रिलीज झाले ४ चित्रपट, ३ सुपरफ्लॉप तर एकाने 'बाजी' मारत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:23 AM2024-01-09T09:23:17+5:302024-01-09T09:33:08+5:30

एकाच टायटलचे ४ सिनेमे आले पण ३ सुपरफ्लॉप ठरले. कोणत्या चित्रपटाने रचला इतिहास वाचा

भारतात मनोरंजनसृष्टी खूप मोठी आहे. इथे सिनेरसिक अधिक आहेत. प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच सिनेमांचं भवितव्य अवलंबून असतं. 1951 ते 1995 या काळात एकाच टायटलचे ४ वेगवेगळे चित्रपट रिलीज झाले. त्यातल्या फक्त एका सिनेमाने इतिहास रचला तर इतर तीन चित्रपट सुपरफ्लॉप झाले. अशा कोणत्या टायटलचा तो सिनेमा होता ज्याने फक्त एकालाच यश मिळालं बघुया.

1 जुलै 1951 रोजी 'बाजी' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. क्राईम ड्रामावर हा सिनेमा आधारित होता. गुरुदत्त यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. देवानंद यांच्या नवकेतन फिल्म प्रोडक्शन हाऊसचा हा दुसरा सिनेमा होता. सिनेमात देवानंद स्वत: मुख्य अभिनेते होते.

हा तोच सिनेमा ज्यामुळे देवानंद यांची डायलॉग बोलण्याची रॅपिड फायर शैली लोकप्रिय झाली. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर तुफान चालला होता. 'आवारा' सिनेमानंतर 1951 सालचा हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता.

दुसऱ्यांदा 'बाजी' याच नावाने 1 नोव्हेंबर 1968 सालीही सिनेमा रिलीज झाल. हा एक थ्रिलर सिनेमा होता. मोनी भट्टाचार्य यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये धर्मेंद्र, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, हेलन यांच्या भूमिका होत्या. कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलं होतं. मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसा चालला नाही.

तिसऱ्या वेळी 1984 साली 'बाजी' नावानेच आणखी एक सिनेमा आला. यामध्ये धर्मेंद्रच मुख्य अभिनेते होते. राज एन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा अॅक्शनवर आधारित होता. धर्मेंद्रसोबतच सिनेमात मिथुन, रेखा, रंजीता,शक्ती कपूर यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाही बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

1995 साली पुन्हा एकदा 'बाजी' नावाने सिनेमा प्रदर्शित झाला. यावेळी सिनेमात बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान मुख्य भूमिकेत होता. सिनेमा प्रेक्षकांना अजिबातच आवडला नाही आणि बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला. आशितोष गोवारीकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर आमिर खानसोबत ममता कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसली.

एकूणच काय तर देवानंद यांनी 'बाजी' सिनेमातून जी जादू केली ती परत इतर कोणालाच जमली नाही. तसंच देव आनंद यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात गुरुदत्त यांना दिलेल्या वचनाचं पालन करत त्यांना हा सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी दिला होता.