गौरी छिब्बर कशी झाली किंग खानची पत्नी? शाहरुखचे चित्रपट फ्लॉप व्हावेत अशी करायची प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 11:30 AM2023-10-08T11:30:38+5:302023-10-08T11:37:58+5:30

गौरीच्या आईवडिलांना पाहिलंय का? लग्नाच्या विरोधात होते शाहरुखचे सासू सासरे

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) एखाद्या राणीपेक्षा कमी नाही. गौरी माध्यमांपासून आणि लाईमलाईटपासून तशी दूर असते मात्र ती प्रसिद्ध डिझायनर आहे. कमाईच्या बाबतीत ती पती शाहरुखच्याही पुढे आहे. आज गौरी खान ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

गौरीचं लग्नाआधीचं नाव गौरी छिब्बर. शाहरुख आणि गौरी म्हणजे बॉलिवूडमधलं आदर्श जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आहेत. मात्र त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच आहे. गौरी बॉलिवूडच्या बादशाहची पत्नी आहे मात्र एकेकाळी शाहरुखचे चित्रपट फ्लॉप व्हावेत अशी गौरीची इच्छा होती.

गौरीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. मूळचा दिल्लीचा असलेला शाहरुख मुंबईत आला हेही तिला पसंत नव्हतं. शाहरुखचं सिनेमात काम करणं, स्टार बनणं हे सगळंच तिच्यासाठी धक्कादायक होतं.

गौरी म्हणाली,'मला वाटायचं त्याचे चित्रपट फ्लॉप व्हावेत. जर असं झालं तर मला त्याच्यासोबत दिल्लीला परत जाता येईल. तेव्हा मी खूप छोटी होते. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी मी त्याच्याशी लग्न केलं होतं. ही फिल्मी दुनिया माझ्यासाठी खूप नवी होती. सगळं फ्लॉप व्हावं असंच मला वाटायचं.'

गौरीशी लग्न करण्यासाठी शाहरुख खानने त्याचं भलतंच नाव तिच्या वडिलांना सांगितलं होतं. आई वडील लग्नाला होकार देणार नाहीत म्हणून तिने शाहरुखचं नाव अभिनव सांगितलं होतं. तो आमचा बालिशपणा होता असंही ती म्हणाली.

शाहरुख खान जसाजसा बॉलिवूडमध्ये सुपरहिट होत होता तशी गौरी घर संसार सांभाळत तिचं पॅशन फॉलो करत होती. गौरीने इंटिरियर डिझायनिंगमध्ये शिक्षण घेतलं होतं. शाहरुख खानने मन्नत बंगला खरेदी केल्यानंतर तो कंगाल झाला होता. तेव्हा गौरीने स्वत:च बंगल्याचं इंटिरियर केलं.

आज गौरी करोडो रुपये कमावते. बॉलिवूड, हॉलिवूड मधील अनेक स्टार्ससाठी तिने डिझायनिंगचं काम केलं आहे. शाहरुखसोबतच ती देखील पॉवरफुल लेडी बनली आहे.

शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत. आर्यन खानने दिग्दर्शनात पदार्पण केलंय तर सुहाना लवकरच बॉलिवूड डेब्यू करत आहे. अबराम सध्या खूपच लहान आहे.

गौरीचे वडील रमेश छिब्बर हे भारतीय सेनेत होते. २०१६ साली त्यांचं निधन झालं. तर तिची आई सविता छिब्बर आता ७७ वर्षांची आहे. ती नेहमीच हाऊसवाईफ राहिली आहे.