Google Doodle : गुगल डूडलवर झळकणारे शिवाजी गणेशन नक्की आहेत कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 01:27 PM2021-10-01T13:27:11+5:302021-10-01T13:37:47+5:30

Google Doodle Sivaji Ganesan: गुगलचं खास डूडल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. या डूडलमधील व्यक्ती कोण आहे? तर एक महान अभिनेता.

गुगलचं खास डूडल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. या डूडलमधील व्यक्ती कोण आहे? तर एक महान अभिनेता. होय, दिवंगत अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या 93 व्या जयंतीनिमित्तानं गुगलनं त्यांचं खास डूडल साकारत त्यांना खास मानवंदना दिली आहे.

आता हे शिवाजी गणेशन कोण होते? हे जाणून घेऊ या. तर शिवाजी गणेशन हे तामिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचं खरं नाव गणेशमूर्ती. एकेकाळी त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मार्लन ब्रांडो’ म्हटलं जात असे. त्यांना शिवाजी हे नाव कसं पडलं, तर त्यामागेही एक किस्सा आहे.

ब्रिटीशकालीन भारतातील मद्रास प्रेसीडेंन्सी (सध्याचे तामिळनाडू) प्रांतातील विल्लुपूरम येथे 1 आॅक्टोबर 1928 ला त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ते थिएटर ग्रुपमध्येही सहभागी झाले. त्यासाठी त्यांनी आपलं घर सोडलं.

गणेशमुर्ती यांनी डिसेंबर 1945 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘शिवाजी कांडा हिंदू राज्यम’ या नाटकात काम केले. त्यांनी यात शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका लोकांना इतकी आवडली की तेव्हापासून लोक त्यांना शिवाजी नावानेच ओळखू लागले.

1952 मध्ये त्यांनी ‘पराशक्ति’ चित्रपटापासून अभिनयाची कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले. तेलुगु, कन्नड़, मल्याळम आणि हिंदी भाषेतही त्यांनी काम केलं.

गणेशन यांनी भरतनाट्यम, कथ्थक आणि मणिपुरी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात गणेशन यांनी काही नकारात्मक भूमिका देखील साकारल्या. या भूमिकादेखील लक्षवेधी ठरल्या.

1960 मध्ये ‘वीरपांडिया कट्टाबोम्मन’साठी त्यांना मिश्र मध्ये एफ्रो-एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेताचा पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते.

दमदार अभिनयासोबतच शब्दांचे जादूगर म्हणूनही ते प्रसिद्ध होते. प्रसिद्ध शिवाजी गणेशन यांना लॉस एंजिल्स टाईम्यने ‘भारताचा मार्लन ब्रांडो’ असे संबोधत त्यांचा गुणगौरव केला होता. 1999 मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता. 21 जुलै 2001 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.

Read in English