फिल्मी स्टोरीसारखी आहे 'धुरंधर'च्या दिग्दर्शकाची लव्हस्टोरी! 'या' अभिनेत्रीसोबत थाटलाय संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:51 IST2025-12-10T15:36:52+5:302025-12-10T15:51:37+5:30
चित्रटापेक्षा कमी नाही 'धुरंधर' च्या दिग्दर्शकाची लव्हस्टोरी, या बॉलिवूड अभिनेत्रीशी केलंय लग्न

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरचा धुरंधर हा सिनेमा बॉक्स ऑफिवर कमाईचे विक्रम रचतो आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अर्जुनची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

'धुरंधर'ला रोमान्स आणि अॅक्शनचा तडका देणाऱ्या या दिग्दर्शकाची लव्हस्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे.

आदित्य धर यांनी बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसोबत लग्न केलं आहे. त्यांच्या सुखी संसाराला ४ वर्ष झाली आहे.

२०२१ साली त्यांनी कोव्हिड काळात अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न केलं. हिमाचल प्रदेश येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या सेटवर झाली पहिली भेट
उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमात यामी गौतमने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

सिनेमाच्या प्रमोशनवेळी दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांच्यात बोलणं होऊ लागलं. त्यानंतर यामी-आदित्यचे सूर जुळले.

आदित्यच्या 'त्या' कृतीने यामीचं जिंकलेलं मन...
एका मुलाखतीत यामी म्हणाली होती की, "उरी सिनेमाच्या सेटवर एक क्रू मेंबर जमिनीवर बसला होता. तर आदित्य खुर्चीवर होता. तो लगेच उठला आणि त्याने क्रू मेंबरला खुर्चीवर बसवलं. ही गोष्ट ऐकायला कितीही साधी, छोटी वाटत असली तरी यातूनच माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे कळतं."

पुढे ती म्हणाली, "त्याने कधीच मला प्रपोज वगैरे केलं नाही. त्याच्या साधेपणाचा मी आदर करते आणि त्यावरच मी भाळले. तसंच आमच्यात बरंच साम्य आहे. आम्हाला दोघांना पार्टी करणं, जास्त सोशल होणं आवडत नाही. शांत घरी एकमेकांसोबत वेळ घालवणंच आम्ही पसंत करतो."
















