२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:55 IST2026-04-12T13:47:46+5:302026-04-12T13:55:51+5:30
Asha Bhosale Death: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल

संगीत विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या सुमधुर गायिकेने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला.

दिग्गज गायिका आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील गाण्यांमध्ये आपल्या मधुर आवाजाची जादू पसरवली आहे. त्यांच्या आवाजातील गोडवा इतका आहे की तो अजूनही लोकांच्या हृदयावर राज्य करतो.

आशा भोसले यांच्यासाठी संगीताचा प्रवास तितका सोपा नव्हता, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९९३ साली सांगली येथे झाला. फक्त ९ वर्षांच्या असताना त्यांनी त्यांचे वडील गमावले.

वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि मराठी चित्रपटांसाठी गाण्यास सुरुवात केली.आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत २० हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी असो, मराठी असो किंवा इतर कोणतीही भाषा असो आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली.

आशा भोसले यांचं हिंदी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. फक्त हिंदीच नव्हे तर त्यांनी दाक्षिणात्य सिनेमांसाठी देखील गाणी गायली आहेत. 'पिया तू अब तो आजा', 'दम मारो दम', 'ये रेशमी जुल्फे' अशी असंख्य गाणी त्यांनी गायली आहेत.

आशा भोसले यांनी भारत आणि परदेशात असंख्य मैफिलींमध्येही सादरीकरण केले आहे. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद आहे. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

















