एका पर्वाचा अंत!आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 15:14 IST2026-04-12T15:04:37+5:302026-04-12T15:14:29+5:30
"तुमच्यासारखा कलाकार ना कधी झाला, ना कधी होईल.", आशा भोसले यांच्या निधनानंतर कलाकार हळहळले

Asha Bhosale Passed Away:गेली आठ दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट संगीतसृष्टीतील अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांचं निधन झालं आहे.आशा भोसले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काल शनिवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

उद्या लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्याच्या निधनाच्या बातमीनं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.अनेक कलाकार तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेमा मालिनी
आशा भोसले यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी आपल्या भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "आशाताई आता राहिल्या नाहीत! जी व्यक्ती इतकी चैतन्यमय होती—जिने आपल्या गाण्यांमध्ये जिवंतपणा आणि वैशिष्ट्य बहाल केले होते—तीच आज आपल्याला शोकात लोटून गेली आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्यासाठी हे विशेषतः कठीण आहे, कारण आशाजींशी माझे एक भावनिक नाते जोडलेले आहे."

पुढे त्यांनी म्हटलंय," त्यांनी आपल्या आवाजाने आणि शैलीने माझी अनेक गाणी अत्यंत लोकप्रिय केली आहेत. लताजी आणि आशाजी यांनी चित्रपटसृष्टीतील माझ्या कारकिर्दीत मोलाचे योगदान दिले आहे.या दोघींशीही माझे अत्यंत विशेष नाते होते."

अजय-अतुल यांची भावुक पोस्ट
आशा भोसले यांच्या निधनानंतर अजय-अतुल यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत म्हटलंय,"संगीताची आशा माळवली. " अशी भावुक करणारी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

अभिनेत्री क्रिती खरबंदाने व्यक्त केल्या भावना...
अभिनेत्री क्रिती खरबंदाने आशा भोसले यांच्या निधनानंतर धक्का बसल्याची भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सोशल मीडियावर आशाताईंचा फोटो शेअर करत लिहिलंय, आशाताई. ती महान स्त्री. त्या लेजेंड होत्या.आज स्वर्गलोकी आनंदोत्सव सुरू आहे; तर इहलोकी मात्र तुमच्या जाण्याने दुःखाचे आणि विरहाचे काहूर माजले आहे. तुमच्या संगीताच्या आणि तुमच्या रूपाने तुम्ही आमच्या हृदयात सदैव जिवंत राहाल. तुमच्यासारखा कलाकार ना कधी झाला, ना कधी होईल."

सलील कुलकर्णी झाले भावुक
"चंद्र उगवेल का आता आकाशात !? चादणे तसेच बरसेल का ?ही फक्त एक व्यक्ती नव्हती …हा फक्त एक आवाज नव्हता ..आपल्या आयुष्याचा भाग होता आणि आहे हा ..आपल्या घरातल्या छोट्या मुलीपासून ..आजीपर्यंत सगळ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज." अशी पोस्ट शेअर करत सलील कुलकर्णी यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विकी कौशल
अभिनेता विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्रामव स्टोरीवर आशाजी यांचे स्टोरी शेअर करत आठवणी ताज्या केल्या आहेत."तुमचा सुमधुर स्वर, तुमची दयाळूपणा, शालीनता आणि मायेचा ओलावा सदैव जिवंत राहील. आशाजी, तुमच्या शांती लाभो."असं भावुक कॅप्शन त्याने या स्टोरीला दिलं आहे.

















