वडिलांसोबत बिनसलं, पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न अन् एका वर्षात घटस्फोट; कोण आहे हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 03:26 PM2023-09-08T15:26:11+5:302023-09-08T15:51:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य म्हणजे एखाद्या सिनेमापेक्षा काही कमी नसतं. लग्न, घटस्फोट म्हणजे त्यांच्यासाठी फार सामान्य गोष्ट. कधी कोणाचं जुळेल आणि कधी तुटेल सांगता येत नाही.

आता हेच बघा 'बुगी वुगी' या प्रसिद्ध डान्स शोचा परीक्षक आणि बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी (Jaaved Jaaferi) याचं आयुष्य काहीसं असंच आहे. 'मेरी जंग' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप यांचा तो मुलगा आहे हे फार कमी जणांना माहित असेल.

वडिलांनी ३३ वर्ष छोट्या मुलीशी तिसरं लग्न केल्यानंतर जावेद जाफरी नाराज झाला होता. मुलाला बघायला आलेल्या मुलीच्या मोठ्या बहिणीच्या ते प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न केलं. यामुळे तो वडिलांचा खूप तिरस्कार करायचा. बऱ्याच वर्षांनी त्यांचं नातं पूर्वपदावर आलं.

जावेदच्या वडिलांना दारु आणि जुगाराचीही सवय होती. यामुळेही तो कायम त्यांच्यावर नाराज असायचा. आपले वडील असे का असा प्रश्न त्याला सतत पडायचा. वडिलांच्या याच सवयींमुळे तो वैतागला होता.

जावेद जाफरी नंतर पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारच्या प्रेमात पडला. ती पाकिस्तानची सर्वात सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री होती. तिने बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. ऋषी कपूर यांच्यासोबत ती 'हीना' सिनेमात दिसली.

१९८९ साली जावेद जाफरीने जेबाशी लग्न केले. त्यांनी लग्नाची बातमी गुप्त ठेवली होती. नंतर जेबाने स्वत: लग्नाचा खुलासा केला. जावेदनेही कबूल केलं. मात्र एक वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

काही वर्षांनी जावेदने हबिबा सोबत दुसरं लग्न केलं. हबिबा सिनेइंडस्ट्रीपासून बरीच दूर आहे. त्यांना मीजान, अब्बास ही दोन मुलं आणि मुलगी अलविया आहे.

जावेद जाफरीने २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीतून राजकारणात एंट्री घेतली. त्याने आम आदमी पार्टीच्या तिकिटावर लखनऊमधून भाजपा नेता राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्याला हार पत्करावी लागली.