Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:59 IST2025-07-17T15:42:37+5:302025-07-17T15:59:07+5:30

Bajrangi Bhaijaan And Harshaali Malhotra : 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाने हर्षाली एका रात्रीत स्टार झाली, तिचं आयुष्य बदललं. चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हर्षालीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'ला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. हर्षाली मल्होत्राने चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारली. तेव्हा हर्षाली ६ वर्षांची होती. 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाने हर्षाली एका रात्रीत स्टार झाली, तिचं आयुष्य बदललं. चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हर्षालीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

हर्षालीने इन्स्टाग्रामवर 'बजरंगी भाईजान' चित्रपटाची बिहाइंड द सीन क्लिप शेअर केली आहे. दिग्दर्शक कबीर खान छोट्या हर्षालीच्या कास्टिंगबद्दल बोलताना दिसत आहेत. जर मुन्नीचं कास्टिंग योग्य नसतं तर हा चित्रपट अपूर्ण राहिला असता असं त्यांनी म्हटलं आहे.

"१० वर्षांपूर्वी... एक असा चित्रपट आला जो फक्त एक गोष्ट नव्हता. ती एक भावना होती. प्रेम, माणुसकी आणि विश्वासाचा मेसेज होता, जो कोट्यावधी लोकांना स्पर्शून गेला. जेव्हा 'बजरंगी भाईजान' माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी फक्त ६ वर्षांची होते."

भावनिक पोस्टमध्ये हर्षालीने सांगितलं की या चित्रपटाने तिला कशी ओळख दिली, तिचं आयुष्य नेमकं कसं बदललं. हा चित्रपट तिच्यासाठी एक गोष्ट नाही तर एक भावना आहे. तिने चाहत्यांचे भरभरून प्रेम दिल्याबद्दल आभारही मानले आहेत.

"मी चित्रपटात एकही शब्द बोलले नाही. पण माझं मौन इतकं ऐकलं जाईल, इतके जाणवेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्या वयात मला फार काही माहित नव्हतं, पण मी 'मुन्नी' समजून घेतली. मुन्नी निष्पाप, शांत होती, पण संपूर्ण चित्रपटाचा आत्मा तिच्यात होता. ती विश्वास ठेवायची."

"ती प्रेम करायची. तुम्ही सर्वांनी तिला इतकं प्रेम दिलं, जे मी कदाचित शब्दात सांगू शकत नाही. मी लहान होते - जिज्ञासू, खोडकर, पण खूप संवेदनशील होते. मला हिंसक सीनची भीती वाटायची. मी कान बंद करायचे, खुर्च्यांमागे लपायचे, कधीकधी रडायचे कारण मला काय चाललंय ते समजत नव्हतं."

"'बजरंगी भाईजान'चा सेट माझ्यासाठी एक सुरक्षित जागा झाली. सलमान सर नेहमीच गोड काकांसारखे वागायचे. कबीर सरांनी प्रत्येक दृश्याला एक गोष्ट बनवली, अशी गोष्ट जी मी फक्त अभिनयाशिवाय अनुभवू शकले. स्पॉट दादापासून ते मेकअप दीदीपर्यंत, सर्वांनी मला आपलंस केलं."

"आम्ही बर्फाळ पर्वतांवर आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांवर शूटिंग केलं, हसलो आणि मजा-मस्ती केली, लाडू वाटले आणि कधीकधी एकत्र रडलो. चित्रपटानंतर लोकांनी मुन्नीला 'बजरंगी भाईजान'चा आत्मा म्हटलं आणि आजही मला जगभरातून लोकांचे यासाठी मेसेज येतात."

"१० वर्षांनंतरही हे प्रेम कमी झालेलं नाही. ही पोस्ट... या आठवणी... हे रील्स हे माझ्याकडून सर्वांचे आभार मान्यासाठी आहे. ज्यांनी मला हे सर्वात मोठं गिफ्ट दिलं. टीममुळे हे शक्य झालं आणि प्रेक्षकांमुळे मुन्नी ही भूमिका अमर झाली, मुन्नी नेहमीच माझ्यामध्ये जिवंत राहील" असं हर्षालीने म्हटलं आहे.

हर्षाली काही वर्षांच्या ब्रेकनंतर तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक कबीर खानने पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की ते बजरंगी भाईजान २ वर काम करत आहेत. हर्षालीने यावर जर चित्रपटाचा दुसरा पार्ट आला तर तिला त्याचा भाग व्हायला आवडेल असं म्हटलं आहे.