आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:35 IST2026-04-13T19:25:45+5:302026-04-13T19:35:27+5:30

आशा भोसले यांच्या काही दुर्मिळ फोटोंवर आपण नजर टाकूया. या फोटोंमध्ये त्यांच्या आयुष्यातील अमूल्य क्षण जपले गेले आहेत.

प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी १२ च्या सुमारास निधन झाले. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली असून चित्रपट, क्रीडा आणि राजकारण क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

तब्बल ७ दशकांचा प्रदीर्घ संगीतप्रवास आणि असंख्य गाणी मागे ठेवून त्या कायमच्या निघून गेल्या. चाहत्यांच्या आठवणींमध्ये आणि आपल्या सुरेल गाण्यांतून त्या सदैव जिवंत राहतील.

आशा भोसले यांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द आणि सुरेलतेचा अद्भुत संगम होता. त्यांच्या काही दुर्मिळ फोटोंवर (Asha Bhosle Unseen Photo) आपण नजर टाकूया. या फोटोंमध्ये त्यांच्या आयुष्यातील अमूल्य क्षण जपले गेले आहेत.

या फोटोमध्ये आशाताई आपल्या कुटुंबासोबत दिसून येत आहेत. आशा भोसले यांना एकूण ३ बहिणी होत्या. मंगेशकर भावंडांमध्ये आशाताई तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांच्या बहिणींची नावे अनुक्रमे लता मंगेशकर, मीना खडीकर आणि उषा मंगेशकर अशी आहेत

१९५६ मधील एका खास फोटोमध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत 'बसंत बहार'च्या रेकॉर्डिंगदरम्यान त्या दिसतात. दोन्ही बहिणींचा हा क्षण संगीतप्रेमींसाठी खास आहे.

तसंच, किशोर कुमार यांच्यासोबतचाही त्यांचा हा फोटो प्रसिद्ध आहे. या दोघांची म्युझिकल केमिस्ट्री आणि गाजलेली डुएट्स आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांची पडद्यामागे मैत्री खूप घट्ट होती, मात्र सुरुवातीला किशोर कुमार यांच्या खोडकर स्वभावामुळे आशा भोसले घाबरत असत.

आशा भोसले संगीतकार शंकर-जयकिशन आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो 'मेरा नाम जोकर' चित्रपटाच्या रिहर्सलदरम्यानचा असल्याचं सांगितलं जातं.

या जुन्या फोटोत आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन दिसत आहेत. हा फोटो एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काढण्यात आला होता. या जोडीने 'चुरा लिया है तुमने जो दिल को' आणि 'दम मारो दम' यांसारख्या रोमँटिक गाणी दिली आहेत.

आशा भोसले यांनी आर डी बर्मन यांच्याशी १९८० मध्ये दुसरं लग्न केलं होतं. त्यावेळी आशा ताई ४७ वर्षांच्या होत्या.

आपल्या व्यावसायिक सहयोगाचे रूपांतर एका वैयक्तिक भागीदारीत केले. आर डी बर्मन यांना प्रेमाने लोक 'पंचम दा' म्हणत.

या फोटोत आशा भोसले यांच्यासोबत देव आनंद, किशोर कुमार आणि आर.डी. बर्मन दिसून येत आहेत.

आशा भोसले यांनी वयाच्या १० व्या वर्षी (१९४३ मध्ये) 'माझा बाळ' या मराठी चित्रपटातून गायनाला सुरुवात केली. 'चला चला नव बाळा' हे गाणे त्यांनी पहिल्यांदा गायलं. त्या वेळी आशा भोसले अवघ्या १० वर्षांच्या होत्या. या गाण्याने त्यांच्या सुवर्ण कारकीर्दीची सुरुवात झाली, जी पुढे अनेक दशके चालू राहिली.

आशा भोसले यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आनंद भोसले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. आज जरी त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या आवाजातील जादू आणि त्यांनी गायलेली असंख्य गाणी पिढ्यानपिढ्या संगीतप्रेमींच्या मनात जिवंत राहतील.