'धुरंधर' अक्षय खन्ना २०२६ ही गाजवणार, आगामी पाच चित्रपट चर्चेत, कधी प्रदर्शित होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:49 IST2025-12-10T17:38:03+5:302025-12-10T17:49:00+5:30

बॉलिवूडचा नवा 'धुरंधर' अक्षय खन्नाचे २०२६ मध्ये येणार 'हे' ५ मोठे चित्रपट

सध्या संपूर्ण भारतात एकाच अभिनेत्याच्या नावाची चर्चा आहे, तो म्हणजे अक्षय खन्ना.

अक्षय खन्नासाठी वर्ष २०२५ हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खास वर्ष ठरले आहे. या वर्षात त्याने नकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांना अक्षरशः थक्क करून सोडले.

२०२५ च्या सुरुवातीला अक्षयने छावा चित्रपटात 'औरंगजेब' या भुमिकेतून प्रेक्षकांना प्रभावीत केले.आता वर्षाच्या अखेरीस, त्याने 'धुरंधर'मध्ये 'रेहमान डकैत' ही भूमिका साकारत पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. 'औरंगजेब' आणि 'रेहमान डकैत' या दोन्ही नकारात्मक भूमिकांमध्ये जीव ओतून काम करत अक्षयनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

'धुरंधर' चित्रपट पाहिल्यानंतर अनेक चाहते अक्षय खन्नाला 'ऑस्कर' देण्याची मागणी करत आहेत. इतका त्याचा अभिनय जबरदस्त झाला आहे.मात्र, अक्षयचा करिष्मा 'धुरंधर'पुरता मर्यादित नाही. २०२६ मध्ये तो एकापाठोपाठ एक अनेक धमाकेदार चित्रपटांतून असाच कहर करताना दिसणार आहे.

'धुरंधर'मधील यशानंतर अक्षय खन्ना २०२६ मध्ये कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे, यावर एक नजर टाकूया.

'धुरंधर'च्या यशानंतर निर्मात्यांनी लगेचच सिक्वेलची घोषणा केली आहे. जो मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्ना पुन्हा एकदा रहमान डकैतच्या भूमिकेत परतणार आहे.

अक्षय खन्ना एका तेलुगू चित्रपटातही दिसणार आहे, ज्याचे नाव 'महाकाली' आहे. या चित्रपटात तो राक्षस गुरु शुक्राचार्य ही भूमिका साकारणार आहे. त्याचे शुक्राचार्यच्या भूमिकेतील पोस्टर नुकतेच प्रदर्शित झालंय. पोस्टरमधील त्याचा लूक पाहून चाहते तर थक्क झालेत.

सध्या अक्षयच्या 'इक्का' या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. हा चित्रपट सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे, कारण यात २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच सनी देओल आणि अक्षय खन्ना एकत्र दिसणार आहेत. 'इक्का' हा एक हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर असून, तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या 'दृश्यम ३' मध्येही अक्षय खन्नाचे पुनरागमन निश्चित असल्याचं बोललं जात आहे. 'दृश्यम ३' २ ऑक्टोबर २०२६ रोजी, गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज करण्याचा प्लॅन निश्चित झाला आहे. आयजी तरुण अहलावतच्या भूमिकेतून अक्षय पुन्हा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडेल, यात शंका नाही.

याशिवाय अक्षय खन्नाचे नाव आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चर्चेत आहे. तो म्हणजे कोर्टरूम थ्रिलर 'सेक्शन ८४'. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिताभ बच्चन, निमरत कौर, डायना पेंटी आणि अभिषेक बनर्जी हे दिग्गज कलाकार असतील. 'सेक्शन ३७५' मध्ये आपल्या भूमिकेने सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या अक्षय खन्नाचा तोच दमदार अंदाज 'सेक्शन ८४' मध्ये पुन्हा पाहायला मिळेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन रिभू दासगुप्ता (Ribhu Dasgupta) करत आहेत.