कान्समध्ये बनारसी साडी! पारंपरिक भारतीय संंस्कृतीचं दर्शन दाखवत बॉलिवूड अभिनेत्रीने वेधलं जगाचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:48 IST2026-05-16T13:40:22+5:302026-05-16T13:48:02+5:30

कान्सच्या रेड कार्पेटवर झळकण्याचं सर्वांचं स्वप्न असतं. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने कान्समध्ये पारंपरिक भारतीय साडी नेसून मैफिल लुटली आहे.

कान्सच्या रेड कार्पेटवर झळकण्याचं सर्वांचं स्वप्न असतं. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने कान्समध्ये पारंपरिक भारतीय साडी नेसून मैफिल लुटली आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे हुमा कुरेशी. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी देखील येथे पोहोचली असून तिच्या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पहिल्या दिवशी 'बॉस लेडी' अवतारात दिसल्यानंतर, आज तिने पारंपरिक बनारसी साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हुमा कुरेशी शुक्रवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. पहिल्या दिवशी तिच्या पाश्चात्त्य लूकने (Western Look) सर्वांना भुरळ घातली. काळ्या रंगाच्या पॉवर सूट आणि त्यावर डायमंड नेकलेस परिधान करून तिने रेड कार्पेटवर अतिशय दमदार हजेरी लावली होती.

मात्र, दुसऱ्या दिवशी ती एकदम पारंपरिक अंदाजात पाहायला मिळाली. जांभळ्या बनारसी साडीत हुमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये हुमा जांभळ्या रंगाच्या बनारसी साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. या साडीसोबत तिने गोल्डन रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

आपले फोटो शेअर करताना हुमाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "बनारसच्या घाटांपासून ते थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत... असा एखादा पोशाख परिधान करण्यात एक वेगळाच आनंद आहे.''

तिने पुढे लिहिले, "मला या साडीची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, ती एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगांना स्वतःमध्ये सामावून घेते. एकीकडे यात पारंपरिक बनारसी विणकामाच्या जुन्या आठवणी आहेत, तर दुसरीकडे आजच्या काळातील आधुनिक डिझाइन्स (motifs) आहेत'', अशाप्रकारे हुमाने भारतीय संस्कृतीचं दर्शन दाखवत कान्स गाजवला.