Ola Electric Investment: इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ओला इलेक्ट्रिक'नं (Ola Electric) आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. शुक्रवारी कंपनीच्या बोर्डानं आपल्या दोन उपकंपन्यांमध्ये २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी सेलच्या उत्पादनाला गती देणं तसंच बाजारातील आपलं स्थान अधिक मजबूत करणं, हा या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या २,००० कोटी रुपयांपैकी तब्बल १,५०० कोटी रुपये 'ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज'मध्ये गुंतवले जातील, जी कंपनी प्रामुख्यानं ईव्ही निर्मिती आणि त्यांच्याशी संबंधित सेवांचे काम पाहते. उर्वरित ५०० कोटी रुपये 'ओला सेल टेक्नॉलॉजीज'मध्ये गुंतवले जातील, ज्यांचं काम बॅटरी सेल तयार करणं आणि त्यांची बाजारात विक्री करणं हे आहे. ही गुंतवणूक 'कंपलसरी कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स'च्या (CCPS) माध्यमातून केली जाणार असून १४ मे २०२७ पर्यंत ती पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
शेअर बाजारात सकारात्मक पडसाद
या मोठ्या घोषणेनंतर शेअर बाजारात ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळाला होता. या गुंतवणूकीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती आणि उत्पादन क्षमता सुधारेल, ज्यामुळे भविष्यातील स्पर्धेत कंपनीला फायदा होईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना आहे.
बॅटरी आणि सेल निर्मितीवर विशेष भर
भारताचं क्लीन मोबिलिटी धोरण आणि स्थानिक पातळीवर सेल उत्पादनाला दिलं जाणारं प्राधान्य या पार्श्वभूमीवर ओलाचं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये 'ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज'ची उलाढाल ४,७१७.४८ कोटी रुपये होती, तर 'सेल टेक्नॉलॉजीज'ने ७३ कोटी रुपयांची कमाई केली होती. या नवीन गुंतवणुकीमुळे ओलाची कार्यक्षमता वाढेल आणि बॅटरीसाठी असणारं आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे,)
