"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:37 IST2026-04-03T16:31:04+5:302026-04-03T17:37:05+5:30

बालपणातील एका अत्यंत भयानक प्रसंगाचा खुलासा केला आहे.

गोविंदाची भाची आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह ही नेहमीच साधेपणाने आणि आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवते. ती कधीही वादात अडकत नाही किंवा कोणाबद्दलही चुकीचं विधान करत नाही.

पर्सनल आयुष्यात ती अत्यंत धाडसी महिला आहे, जी कोणत्याही संकटाचा सामना करण्यास समर्थ आहे. आरतीने तिच्या बालपणातील एका अत्यंत भयानक प्रसंगाचा खुलासा केला आहे. लहानपणी तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यावेळी तिला जीव द्यावासा वाटला होता.

'Hauterrfly' ला दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने तिच्या आयुष्यातील हा किस्सा शेअर केला. तिने सांगितलं की, जेव्हा ती केवळ १३ वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता.

धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य करणारा दुसरा कोणी नसून त्यांच्याच घरचा नोकर होता. त्या रात्रीची आठवण सांगताना ती म्हणाली, "मी १३ वर्षांची असताना आमचा नोकर माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला होता."

आरती पुढे म्हणाली, "मला फक्त एवढंच आठवतंय की मी झोपले होते आणि तो माझ्या खोलीत आला. स्वतःचा बचाव करण्यासाठी मी हात जोडून त्याची विनवणी केली, मी त्याला म्हटलं की तू तर माझा भाऊ आहेस ना!"

"आई फार्महाऊसवर गेली होती आणि बाहेर खूप उकाडा होता. त्या भयानक परिस्थितीतून वाचण्यासाठी मी हळूहळू वर गेले आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली."

आरती सांगते की, ती इतकी खंबीर होती की त्या उडीनंतरही तिला काही गंभीर इजा झाली नाही. एवढ्या लहान वयात आरतीने ज्या हिमतीने स्वतःचा बचाव केला, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

याआधीही 'बिग बॉस १३' मध्ये जेव्हा दीपिका पदुकोण आणि लक्ष्मी अग्रवाल पाहुणे म्हणून आले होते, तेव्हा आरतीने या घटनेचा उल्लेख केला होता. त्या वेळीही तिने सांगितले होते की, ही गोष्ट आठवताना आजही तिचा थरकाप उडतो.

आरती सिंहने टीव्हीवर 'मायका', 'देवों के देव महादेव', 'उतरन' आणि 'उडान' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलx आहे. 'बिग बॉस १३' मध्येही ती फायनलिस्ट होती. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असते.