मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ संपूर्ण देशात कोणत्याही शहरामध्ये नाही : अनुपम खेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:57 IST2025-08-06T10:55:30+5:302025-08-06T10:57:24+5:30
लता मंगेशकर पुरस्कारासह राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान

मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ संपूर्ण देशात कोणत्याही शहरामध्ये नाही : अनुपम खेर
मुंबई : मुंबईएवढे मोठे ‘हृदय’ देशातल्या कोणत्याही शहराचे नाही. हे मोठे दिलवाले शहर आहे. ते सर्वांना संधी देते. त्याने मलाही दिली. एकेकाळी खेरवाडी, खेरनगर, बांद्रा वेस्ट, असा पत्ता असलेला अनुपम खेर आज असा तुमच्यासमोर आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
वरळीतील एनएससीआय डोममध्ये लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, बिभीषण चवरे, स्वाती म्हसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हीरकमहोत्सवी विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मिता गव्हाणकर, अमृता सुभाष आणि प्रसाद ओक यांनी सूत्रसंचालन केले.
या सोहळ्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ सन्मानित करण्यात आले. २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना, चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात आला.
‘मी पुन्हा येईन’चे कॉपीराईट माझ्याकडे : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी सर्व कलाकारांचे वैशिष्ट्य सांगत त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘काजोल यांनी आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली. आज तनुजाही उपस्थित आहेत, खूपच आनंद वाटला. अनुपम खेर चतुरस्त्र कलाकार आहेत.
‘मी पुन्हा येईन’ हा माझा डायलॉग त्यांनी म्हटला आहे, पण त्याचे कॉपी राईट माझ्याकडे आहे. मुक्ता बर्वे ३६० डिग्री अभिनेत्री आहेत. महेश मांजरेकर केवळ आवाजाने प्रभाव टाकतात. सुरेश भट आणि भीमराव पांचाळे हे अमरावती जिल्ह्यातील दोन हिरे आहेत. विशाल शर्मा यांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला.
मुंबईत विनाशुल्क चित्रीकरण करण्याची सुविधा : शेलार
आशिष शेलार म्हणाले की, यावेळी पुरस्कार निवडताना खूप मोठी चुरस असल्याची जाणीव झाली. जगाच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोहिनी घालण्याची क्षमता आपल्या कलाकारांमध्ये आहे. मुंबईतील कोणत्याही ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचा उल्लेखही शेलार यांनी केला.
आजचा दिवस विशेष : काजोल
आज माझा वाढदिवस असल्याचे सांगत काजोल म्हणाली की, हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. कारण माझी आई माझ्यासोबत आली आहे. मी तिची साडी परिधान केली आहे. कारण तिला हा पुरस्कार मिळाला होता. तो मिळाल्याने करिअरमध्ये काहीतरी केल्याची जाणीव झाल्याचेही काजोल म्हणाली.
जबाबदारी वाढली : मांजरेकर
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, राज्य पुरस्काराच्या बाहुल्या माझ्याकडे खूप आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. तरुणपणी टेम्पो विकत घेण्याचा विचार केल्यापासून आतापर्यंतचा हा प्रवास लक्षणीय आहे. त्यावेळी प्लाझासमोरील फुटपाथवर फरची टोपी घातलेल्या व्ही. शांताराम यांना पाहायचो. आज त्यांच्या नावानेच पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे.
भरून पावलो : भीमराव पांचाळे
भीमराव पांचाळे यांनी ‘पालवीने दिली ना, फुलाने दिली, सावली मला या उन्हाने दिली’ या नवीन गझलमधील शेर गात मी आज भरून पावलो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी चकवा या पहिल्या चित्रपटापासूनचा इथंपर्यंतचा प्रवास खूप मोठा असल्याचे सांगितले.
अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
२०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महावारसा हा नवीन पुरस्कार युनोस्कोतील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी, राजदूत विशाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला.