'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची 'मिर्झापूर' चित्रपटात एन्ट्री, पुढील आठवड्यात शूटिंग होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:48 IST2025-09-05T10:27:54+5:302025-09-05T13:48:07+5:30
या चित्रपटात आणखी एका प्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री झाली आहे.

'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची 'मिर्झापूर' चित्रपटात एन्ट्री, पुढील आठवड्यात शूटिंग होणार सुरू
'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की 'मिर्झापूर'वर चित्रपट बनणार आहे. आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. चित्रपटाचे सह-निर्माते फरहान अख्तर यांनी या बातमीची पुष्टी केली आहे.
'मिड-डे'च्या रिपोर्टनुसार, 'मिर्झापूर' चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यात मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी (कालीन भैय्या), अली फजल (गुड्डू भैय्या) आणि दिव्येंदू (मुन्ना भैय्या) त्यांच्या लोकप्रिय भूमिकांमध्ये परत येणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात आणखी एका प्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री झाली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेता मोहित मलिक 'मिर्झापूर'च्या जगात सामील होणार आहे. मोहितने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. त्याने लिहिले, "मिर्झापूरच्या जगात सामील होण्यास उत्सुक आहे! या स्वागतासाठी टीम आणि निर्मात्यांचे आभार. मी कृतज्ञ आहे आणि या प्रवासाची आतुरतेने वाट पाहत आहे".
मोहितने 'डोली अरमान की' आणि 'कुल्फी कुमार बाजेवाला' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचे अनेक दशकांपासून मनोरंजन केले आहे. आता तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करत 'मिर्झापूर'मध्ये आपली जादू दाखवणार आहे. याशिवाय, रवी किशन आणि जितेंद्र कुमार हे देखील चित्रपटाचा भाग असण्याची शक्यता आहे.