रंगभूमीवर पुन्हा गुंजणार कुणी घर देता का घर?, तो ‘नटसम्राट’ नाना पाटेकर नाही तर हा अभिनेता साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 15:44 IST2018-10-18T15:44:08+5:302018-10-18T15:44:44+5:30

नाटकातील कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Who will give a home to revive theater again ?, if it is not 'Natsa Samrat' Nana Patekar | रंगभूमीवर पुन्हा गुंजणार कुणी घर देता का घर?, तो ‘नटसम्राट’ नाना पाटेकर नाही तर हा अभिनेता साकारणार

रंगभूमीवर पुन्हा गुंजणार कुणी घर देता का घर?, तो ‘नटसम्राट’ नाना पाटेकर नाही तर हा अभिनेता साकारणार

कुणी घर देता का घर?, असं म्हणत हतबल होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आणि आपलं गतवैभव शोधणाऱ्या महान कलाकाराची शोकांतिका मांडणारी कलाकृती म्हणजे नटसम्राट. शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलं. या नाटकातल्या गणपतराव म्हणजेच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तीरेखा नाट्यरसिकांना भावली आणि या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. याच नाटकावर आधारित नटसम्राट हा सिनेमाही रूपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरला. या नाटकात नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रसिकांच्या काळजात घर करून गेली. आता रंगभूमी-सिनेमा असा प्रवास करणारी हीच कलाकृती पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज होत आहे.
 
'हॅम्लेट', 'अलबत्या गलबत्या' या नाटकांच्या यशानंतर एक खाजगी मराठी वाहिनी ‘नटसम्राट’ हे नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. त्यामुळे या नाटकात आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका कोण साकारणार याची रसिकांना उत्सुकता असणारच. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते यांनी गणपतराव साकारले आहेत. मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांनी ही व्यक्तीरेखा साकारली. त्यामुळे नाना ही भूमिका साकारणार याची चर्चा होती. मात्र ही भूमिका नाना पाटेकर साकारणार नाहीत. यावेळी अभिनेता मोहन जोशी रंगभूमीवर ‘नटसम्राट’चं आव्हान पेलणार आहेत. नाटकातील कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. आजवर विविध दिग्गज कलाकारांनी गणपतराव बेलवलकर ही भूमिका रंगभूमीवर गाजवली आहे. त्यांच्याप्रमाणेच मोहन जोशीसुद्धा या भूमिकेला न्याय देतील असा विश्वास रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना आहे. सध्या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली असून ४ नोव्हेंबर रोजी हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Web Title: Who will give a home to revive theater again ?, if it is not 'Natsa Samrat' Nana Patekar