"आमच्यात कधीच इगो नसायचा उलट..", निवेदिता सराफ अभिनेत्रींच्या आपापसातील स्पर्धेबद्दल स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:20 IST2025-09-15T18:19:39+5:302025-09-15T18:20:27+5:30
Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी नुकतेच एका मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्रींमधील बॉण्डिंगबद्दल सांगितलं.

"आमच्यात कधीच इगो नसायचा उलट..", निवेदिता सराफ अभिनेत्रींच्या आपापसातील स्पर्धेबद्दल स्पष्टच बोलल्या
निवेदिता सराफ (Nivedia Saraf) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. नव्वदच्या दशकापासून त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत काम करत आहेत. तसेच नुकताच त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यातील एका ठिकाणी त्यांनी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींच्या एकमेकांमधील स्पर्धेबद्दलचं मत मांडलं.
निवेदिता सराफ यांनी नुकतेच नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रींमधील बॉण्डिंगबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या की, "त्यावेळी आम्हाला व्हॅनिटी व्हॅन नव्हती...तीन वेगवेगळ्या चित्रपटाच्या हिरोईन एकाच मेकअप रूममध्ये मेकअप करत असायचो...आमच्यात कधीच इगो नसायचा उलट तुझं काम किती छान झालं! असं म्हणून एकमेकींच कौतुक करायचो...वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, किशोरी शहाणे, अलका कुबल, सविता प्रभुणे, सुप्रिया पिळगावकर या सगळ्यांसोबत एकत्र काम केलं. तिटकारा करण्यासारखं असं कोणीच नाही वागलं. हसत खेळत मजेत शूटिंग व्हायचं... आता तसं होत नाही कारण स्पर्धा खूप वाढली आहे."
'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाबद्दल
'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमा लिव्ह इनसारख्या विषयावर भाष्य करतो. या सिनेमात निवेदिता सराफ यांनी उमा नावाचे पात्र साकारले आहे. या भूमिकेबद्दल निवेदिता सराफ यांनी लोकमत फिल्मीला सांगितलं की, उमा खूप धाडसी निर्णय घेणारी आहे. तिच्यामध्ये निर्मळ मनाने क्षमा करण्याची ताकद आहे. उमा या भूमिकेला अनेक बाजू आहेत. ज्या या सिनेमातून दाखवल्या गेल्या आहेत. या सिनेमातील संवाद खूप छान आहेत. जे मला खूप भावले. प्रिया आणि उमेशबद्दल सांगायचे झाले तर ते दोघेही खूप मेहनती आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मजा आली.