अभिनयातील 'वजीरा'चा महासन्मान! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:24 PM2024-01-30T17:24:58+5:302024-01-30T17:35:19+5:30

मनोरंजनसृष्टीतून आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Veteran marathi actor Ashok Saraf announced Maharashtra Bhushan Award CM Eknath Shinde congratulate him | अभिनयातील 'वजीरा'चा महासन्मान! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण'

अभिनयातील 'वजीरा'चा महासन्मान! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण'

सिनेमा असो, नाटक किंवा छोट्या पडद्यावरची मालिका... भूमिका तुफान विनोदी असो, नर्म विनोदी असो किंवा धीरगंभीर... ज्यांनी आपल्या परिसस्पर्शानं शेकडो भूमिकांचं सोनं केलं, मराठी रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि मराठी सिने-नाट्यसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले, असे अभिनयातील वजीर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना आज अत्यंत प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

"ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले" अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच अशोक सराफ 'एबीपी'ला प्रतिक्रिया देताना म्हणाले, "मला कल्पना नव्हती की मला हा पुरस्कार मिळेल. लोकांना माझं काम आवडतंय, माझी आतापर्यंतची धडपड सार्थ झाल्याची भावना माझ्या मनात आहे. ज्या ज्या माणसांनी माझ्यासोबत काम केलं, त्या प्रत्येकाला मी याचं श्रेय देईन."

अभिनेते अशोक सराफ यांना प्रेमाने सर्वजण 'मामा'अशी हाक मारतात. अशोक मामांचा जन्म 1947 साली मुंबईतच झाला. 1969 पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. 'जानकी' या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी 'आयत्या घरात घरोबा','अशी ही बनवाबनवी','बाळाचे बाप ब्रह्मचारी','भूताचा भाऊ','धुमधडाका'सह 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. 'सिंघम' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'गुप्त', 'कोयला', 'येस बॉस', 'करण अर्जुन', 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या. 

Web Title: Veteran marathi actor Ashok Saraf announced Maharashtra Bhushan Award CM Eknath Shinde congratulate him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.