ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:14 IST2025-10-28T09:11:44+5:302025-10-28T09:14:17+5:30
'वस्तहरण'कार गंगाराम गवाणकर यांचं निधन

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gangaram Gavanakar Passed Away: 'वस्त्रहरण', 'दोघी', 'वनरुम किचन' या नाटके संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. सगळीकडूनच या नाटकांना भरभरून प्रेम मिळालं. हे अजरामर नाटक ज्यांनी रचलं, त्या कोकणपुत्र ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं निधन झालं. वयोपरत्वे आलेल्या आजाराशी झुंज देताना काल सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दहिसर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गंगाराम गवाणकर ८६ वर्षांचे होते. गवाणकर यांचे वस्त्रहरण हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजले. मालवणी भाषेला उंची गाठून देण्यात गवाणकर यांनी मोलाचे योगदान दिले.महाराष्ट्राच्या विविध बोलींच्या नाटकांची लाट पसरली होती. अगदीच पु.ल. यांनीही गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ची भरभरून प्रशंसा केली होती. गवाणकर यांनी ‘दोघी’, ‘वनरूम किचन’, ‘वरपरीक्षा’, ‘वर भेटू नका’ अशा अनेक नाटकांची रचना केली, तसेच काही पुस्तकेदेखील लिहिली होती. सुरुवातीच्या काळात एमटीएनएलमध्ये नोकरी करत त्यांनी आपला नाट्य लेखनाचा छंद सुद्धा जोपासला. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवर आपली वाटचाल सुरु केली. ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. असा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मागील काही महिन्यांपासून गंगाराम गवाणकर यांची प्रकृती थोडी नाजूक होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दहिसर येथील अंबावाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.