लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांना सांगितली जुनी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 03:41 PM2024-02-16T15:41:45+5:302024-02-16T15:42:14+5:30

Varsha usgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगांवकर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु, एक होता विदूषक या सिनेमाचा किस्सा अभिनेत्रीने यावेळी सांगितला.

varsha-usgaonkar-reveals-about-laxmikant-berde-wish-which-never-came-true | लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांना सांगितली जुनी आठवण

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांना सांगितली जुनी आठवण

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (varsha usgaonkar). उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला. वर्षा यांनी लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikanth berde), अशोक सराफ (ashok saraf) यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं. त्यामुळेच नुकत्याच दिलेल्या 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी लक्ष्मीकांत यांच्या मनात कायम राहिलेली खंत कोणती हे सुद्धा त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीमध्ये वर्षा यांनी लक्ष्मीकांत यांच्या अभिनयाविषयी भाष्य केलं. सोबतच त्यांच्या मनात कायमस्वरुपी राहिलेली खंत कोणती होती हे सुद्धा सांगितलं. "मला वाटतं जर आज लक्ष्या असता तर तो वेगळ्या पद्धतीने चमकला असता.त्याचं अकाली निधन झालं असंच मी म्हणेन. लक्ष्यासोबत मी 'एक होता विदूषक' हा सिनेमा केला. पण, लक्ष्याचं म्हणजे कॉमेडी, कॉमेडी आणि कॉमेडी असंच समजलं जात होतं. आणि, लक्ष्याला सुद्धा याविषयी खंत होती. माझा एक वेगळा पैलू आहे तो प्रेक्षकांना दिसला पाहिजे हे त्याला  कायम वाटायचं", असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "जब्बार पटेल यांनी हा सिनेमा लक्ष्याला दिला होता. त्यावेळी लक्ष्याने मला फोन केला आणि या सिनेमात मला तू हवी आहेस असं सांगितलं. तू हा सिनेमा कर. तो स्त्रीप्रधान नाहीये आणि तुला त्यासाठी मानधन सुद्धा कमी मिळेल. पण, तू हा सिनेमा करावास अशी माझी इच्छा आहे. त्याच्या सांगण्यावरुन, त्याच्या शब्दाखातर मी सुद्धा तो सिनेमा केला. आणि, मला सुद्धा सिनेमाची कथा, माझा रोल आवडला होता त्यामुळेच मी होकार दिला."

दरम्यान, "एक होता विदूषक सिनेमात लक्ष्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स होता. पण, त्यावर्षीचं अवॉर्ड त्याला मिळालं नाही. त्याला खूप वाईट वाटलं होतं की, या सिनेमासाठी त्याला पुरस्कार मिळाला नाही. जर ते त्याला मिळालं असतं तर त्याच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू पडला असता आणि विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता. त्यामुळे तो पुरस्कार त्याला मिळाला नाही याची खंत मलाही वाटते", असंही वर्षा उसगांवकर यांनी म्हटलं.

Web Title: varsha-usgaonkar-reveals-about-laxmikant-berde-wish-which-never-came-true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.