"राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव", तेजस्विनी पंडितचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 16:08 IST2023-10-21T16:07:01+5:302023-10-21T16:08:18+5:30
तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अभिनय, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच तेजस्विनीने या मुलाखतीत राजकारणाबाबतही तिचं असलेलं मत अगदी परखडपणे मांडलं.

"राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव", तेजस्विनी पंडितचं वक्तव्य
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या अभिनयाने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनयाव्यतिरिक्तही तेजस्विनी तिच्या बेधडक स्वभावासाठी विशेष ओळखली जाते. आजवर अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी तेजस्विनी समाजातील अनेक घडामोडींवर अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'च्या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती.
तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अभिनय, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच तेजस्विनीने या मुलाखतीत राजकारणाबाबतही तिचं असलेलं मत अगदी परखडपणे मांडलं. तेजस्विनी म्हणाली, "राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव आहे...त्यांचं नाही." पुढे ती "तुम्ही जर जबाबदार व्यक्तिमत्त्व आहात, तर तुमची भूमिका मांडताना तुमच्याजवळ क्लॅरीटी असली पाहिजे. जर ती नसेल तर समोरच्याचा मनात चीटिंग केल्याची भावना येते. मग मी प्रश्न विचारणारच आहे. मग ते तुम्हाला का झोंबतंय?" असंही म्हणाली.
तेजस्विनीने काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोलबाबतचा एक व्हिडिओ शेअर करत ट्वीट केलं होतं. तिचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं होतं. तेजस्विनीच्या या ट्वीटनंतर तिच्या अकाऊंटवर कारवाई करत ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. त्यानंतरही तेजस्विनीने संताप व्यक्त केला होता.
दरम्यान, तेजस्विनीने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'अगं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटांत ती झळकली. 'मी सिंधुताई सकपाळ' या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. चित्रपटांबरोबरच वेब सीरिज आणि मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 'रानबाजार', 'अनुराधा' या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.