"यशस्वी लोक ट्रोल होतात", स्वप्नील जोशीचं ट्रोलिंगला उत्तर, म्हणाला "यशाचं कौतुक करणं वाईट नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:26 IST2025-04-11T15:25:15+5:302025-04-11T15:26:56+5:30
स्वप्नील जोशीनं ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.

"यशस्वी लोक ट्रोल होतात", स्वप्नील जोशीचं ट्रोलिंगला उत्तर, म्हणाला "यशाचं कौतुक करणं वाईट नाही"
Swapnil Joshi on Trolling: स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट हिरो' म्हणून त्याला ओळखलं जात. स्वप्नीलचा सोशल मीडियावरही भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. अभिनेत्याने त्याच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत बऱ्याच चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकं असूनही स्वप्नील गेल्या काही वर्षात बरंच ट्रोल होत आहेत. त्याने नुकतंच ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
अलिकडेच स्वप्नील जोशीनं 'आरपार' या यूट्यूब चॅनेलला एका मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला 'तू शाळेत पहिल्या बाकावर बसणारा विद्यार्थी होतास का? पहिल्या बाकावर बसणारे खूप ट्रोल होतात, असा प्रश्न केला. यावर बोलताना स्वप्नील म्हणाला, ठहो, मी पहिल्या बाकावर बसणारा विद्यार्थी होतो. मला वाटतं की यशस्वी लोकं ट्रोल होतात. आपल्याकडे यशस्वी होणं, आपण याला एक नकारात्मक सूर लावतो. आपण यशस्वी असलो की त्याबद्दल आपल्या मनात अपराधीपणाची भावना येते. पैसे कमावण्याबाबतही तसंच करतो. तुमचं काय बाबा…असं लोकांकडून ऐकायला मिळतं. हो कमावलेत पैसे, मग काय... मेहनत करून कमवलेत. मी यशस्वी आहे असं आपल्याला कोणाकडून ऐकण्याची सवयच नाहीये. एखादा माणूस यशस्वी आहे, तर आपल्याला मनापासून म्हणता आलं पाहिजे की तू यशस्वी आहेस. मला तुझ्या यशाचा मंत्र सांग, त्यातून मी यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन. आपण, तू कसा यशस्वी नाहीस या वादातच वेळ वाया घालवतो".
तो म्हणाला, "ट्रोल करण्याची पद्धत वेगळी असेल, पण जर लक्षात आलं, समोरच्याला ट्रोल करून मला काहीच फायदा होत नाही तर समोरच्याचं ट्रोलिंग होणार नाही. ज्या क्षणी समोरच्याला ट्रोल केल्यानंतर त्या कमेंटला ट्रॅक्शन येतं, त्याक्षणी ते ट्रोलिंग वाढतं. त्यामुळे माझ्यासाठी मी ट्रॅक्शनमध्ये आहे की नाही हे जज करण्याचं मीटर आहे".
स्वप्नील जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'सुशीला सुजीत' सिनेमा १८ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात स्वप्नीलसोबत सोनाली कुलकर्णी, सुनील तावडे, नम्रता संभेराव, रीलस्टार अथर्व सुदामे, रेणुका दफ्तरदार, राधा सागर, राजेंद्र शिसाटकर, अजय कांबळे हे कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाची संपूर्ण टीम गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आगळंवेगळं कथानक असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडे दिवस वाट पाहावी लागेल.