सुखविंदर सिंग यांच्या आवाजातलं 'उडूदे भडका' गाणं रिलीज, पुष्कर जोगचा जोशपूर्ण अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:53 IST2024-10-16T13:53:06+5:302024-10-16T13:53:40+5:30
‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटातील 'उडूदे भडका' गाणं रिलीज झालंय (pushkar jog)

सुखविंदर सिंग यांच्या आवाजातलं 'उडूदे भडका' गाणं रिलीज, पुष्कर जोगचा जोशपूर्ण अंदाज
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या रंजक ट्रेलरने अनोखं रहस्य निर्माण केलं असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यातच आता या चित्रपटातील 'उडूदे भडका' हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात पुष्कर जोग एका अनोख्या आणि जोशपूर्ण रूपात दिसत आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे.
'उडूदे भडका' गाण्याविषयी
‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटातील 'उडूदे भडका' हे जबरदस्त गाणे बॉलिवूडला सुपरहिट गाणे देणारे सुखविंदर सिंग आणि हितेश मोडक यांनी गायले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल शेट्ये यांनी केले असून 'उडूदे भडका' गाण्यातून नायकाच्या मनातील राग, बदल्याची आग, आक्रमकता व्यक्त होताना दिसत आहे.
दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर जोग या गाण्याबद्दल म्हणतात, '' बदला घेण्यासाठी पेटून उठणाऱ्या नायकाच्या मनातील राग या गाण्यातून व्यक्त होत आहे. गाण्याचे बोल खूपच अर्थपूर्ण आहेत आणि त्याला हितेश मोडकचे सर्वोत्कृष्ट संगीत लाभल्याने हे गाणे अधिकच रंजक बनले आहे. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग आणि हितेश मोडक यांच्या जबरदस्त आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. एकनादरच हे गाणे अतिशय भव्य झाले आहे. प्रेक्षकांनी या गाण्याच्या माध्यमातून चित्रपटातील संघर्ष आणि तीव्र भावना अनुभवाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे." पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बियु प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. २५ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होत आहे.