"हा फोटो घ्यायला २२ वर्ष लागली", रितेशसाठी 'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "मी पाचवीत होतो तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:34 IST2025-12-17T17:33:10+5:302025-12-17T17:34:07+5:30
रितेशच्या सिनेमात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनरावचीही वर्णी लागली आहे. आज रितेशच्या वाढदिवसानिमित्त कपिलने खास पोस्ट शेअर केली आहे.

"हा फोटो घ्यायला २२ वर्ष लागली", रितेशसाठी 'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "मी पाचवीत होतो तेव्हा..."
महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस आहे. मराठीसोबतच रितेशने बॉलिवूडही गाजवलं आहे. तुझे मेरी कसम या सिनेमातून पदार्पण केलेल्या रितेशने नंतर अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमांतही काम केलं. त्याचे अनेक सिनेमे गाजले. लवकरच रितेश 'राजा शिवाजी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेशच्या सिनेमात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनरावचीही वर्णी लागली आहे. आज रितेशच्या वाढदिवसानिमित्त कपिलने खास पोस्ट शेअर केली आहे.
कपिलने रितेशसोबतचे सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये तो म्हणतो, "माझं आणि रितेश सर यांच्या गावाचं अंतर ६० किमी आहे आणि हा फोटो घेण्यासाठी मला २२ वर्ष लागली. वर्ष २००३ 'तुझे मेरी कसम' सरांचा पहिला चित्रपट रिलीज होणार होता आणि उदगीरमधे रितेश सरांची बाइक रॅली होती. लाखो लोक रितेश सरांना पाहण्यासाठी रोडच्या आजूबाजूला होती . मी पाचवीत होतो तेव्हा..त्या बाइक रॅलीमध्ये मी पहिल्यांदा सरांना पाहिलं होतं. लाल रंगाचं टी शर्ट, काळ्या रंगाचा डोळ्यावर गॉगल, निळी जीन्स, गोरापान चेहरा, भुरभुर उडणारे केस... इतकी प्रचंड गर्दी होती. ते आजही तसेच आहेत. जसं मी त्यांना २००३ मध्ये पाहिलं".
पुढे तो म्हणतो, "सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये सर येऊन गेले . वेडच्या प्रमोशनला. त्या दिवशी माझं शूट लागलं नाही. ती भेटण्याची संधी पण हुकली. स्टार प्रवाहवर सर धिंगाणासाठी आले होते. त्या एपिसोडला पण मी नव्हतो. खूप वाईट वाटायचं. कधी कधी वाटायचं. सोबत काम करणं सोडा, साधी सेटवर भेट तरी होईल का नाही कधी... कारण माझं एक स्वप्न होतं रितेश सरांना भेटायचं तर सेटवरच. पण त्या सगळ्या भेटी नाही होऊ शकल्या कारण ही भेट होणे होती. कारण इथेच ह्याच दिवशी माझं राज्या शिवाजी ह्या चित्रपटासाठी कास्टिंग झालं होतं. हा फोटो मी सांभाळून ठेवला होता सर .Wishing you very Happy birthday @riteishd sir . वाढदिवसायच्या खूप खूप शुभेच्छा".