शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:49 IST2024-11-01T14:39:56+5:302024-11-01T14:49:09+5:30
दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसंच या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान' या सिनेमाची वाट बघत आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर पुन्हा एकदा एक संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसंच या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
'संगीत मानापमान' सिनेमातून शौर्य, धैर्य आणि प्रेमाचा नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमधून याची झलक अनुभवता येत आहे. १ मिनिट २१ सेकंदाच्या या टीझरने 'संगीत मानापमान' सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. टीझरच्या सुरुवातीलाच एक राजवाडा दिसत आहे. त्यानंतर राजबिंडा दिसत असलेल्या सुमीत राघवन एन्ट्री घेताना दिसत आहे. राजकुमारी असलेली वैदेही परशुरामी टीझरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. तर "पराक्रमाला धाडस लागतं वारसा नाही", असं म्हणत धैर्यधर ही भूमिका साकारणारा सुबोध भावे त्याचं शौर्य दाखवताना दिसत आहे.
या सिनेमाच्या टीझरमध्ये उपेंद्र लिमये यांच्यावर मात्र सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यांची सिनेमातील एन्ट्री हे चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज आहे. याबरोबरच निवेदिता सराफ, अर्चना निपणकर, नीना कुलकर्णी, शैलेश दातार या कलाकारांचीही झलक 'संगीत मानापमान'च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
'संगीत मानापमान' हा सिनेमा संगीतप्रेमी प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. शंकर एहसन लॉय यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. तर शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, सावनी रविंद्र, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर या गायकांच्या स्वरांनी नटलेला हा सिनेमा आहे. सुबोध भावेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. नववर्षाच्या मुहुर्तावर १० जानेवारीला 'संगीत मानापमान' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.