'शहराचा गळा घोटून...", मतदानानंतर सुबोध भावेची खरमरीत प्रतिक्रिया; नागरिकांचा दबावगट हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:22 IST2026-01-15T11:19:22+5:302026-01-15T11:22:23+5:30
गेल्या काही वर्षांपासून पुण्याचं बदललेलं स्वरुप मुंबईपेक्षाही जास्त भयंकर होत चाललं आहे.

'शहराचा गळा घोटून...", मतदानानंतर सुबोध भावेची खरमरीत प्रतिक्रिया; नागरिकांचा दबावगट हवा
अभिनेता सुबोध भावे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. आज पुण्यात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुबोधने सडेतोड प्रतिक्रिया दिली. पुणे शहर, विकास, सामाजिक प्रश्न आणि राजकारण या सगळ्यावर तो बोलला. यावेळी त्याने नागरिकांना काही सूचना केल्या. तसंच अप्रत्यक्षपणे त्याने राजकारण्यांनाही सुनावलं. 'शहराचा गळा घोटून विकास होत नसतो' या त्याच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
काय म्हणाला सुबोध भावे?
पुण्यात मतदान केल्यानंतर सुबोध भावेने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मतदान करणं हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि तो आपण पाळला पाहिजे. आपलं कर्तव्य केलं पाहिजे. फक्त मतदान करुन आपण नंतर बाहेर बसतो हे लोकशाहीत अपेक्षित नाही. ज्या उमेदवारांना आपण निवडून पाठवतो त्यांनी आश्वासनं दिलेली असतात ती वेगळी गोष्ट आहे. पण नागरिकांच्या समस्यांवर ते काम करतायेत की नाही यावर लक्ष ठेवणं नागरिकांचं काम आहे. तो जर दबाव उमेदवारांवर,राजकारण्यांवर नसेल तर आपणच निवडून दिलेल्या लोकांविरुद्ध तक्रारी करुन उपयोग नाही. दुर्दैवाने असा कुठलाही नागरिकांचा दबावगट ना पुण्यात आहे ना राज्यात आहे. देशातलं मला माहित नाही. पण असं कुठेही दिसत नाही."
"माझा पुण्यात जन्म झालाय, शिक्षण झालंय मला या शहराचा अभिमान आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुण्याचं बदललेलं स्वरुप मुंबईपेक्षाही जास्त भयंकर होत चाललं आहे. अशा या बदलत्या पुण्याच्या परिस्थितीला जर नागरिकांनी स्वत:चं दबावतंत्र वापरुन बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर काही उपयोग नाही. आता आपण ज्यांना निवडून देतोय ते महानगरपालिकेत जाऊन बसतील आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आपण गप्पच बसून राहणार असू तर आपल्याला त्यांच्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार नाही."
विकासावर सुबोध म्हणाला, "३ मजली इमारतीच्या जागी २७ मजली इमारती झाल्या म्हणजे विकास नाही. नवीन कन्स्ट्रक्शन वाढलं यामुळे अनेक समस्या वाढल्या. शहराचा गळा घोटून विकास करायचा नसतो. मुलांना खेळायला ग्राउंड नाहीत, जेष्ठ नागरिकांना फिरायला जागा नाहीत, पेशवे, सारसबागाच्या नावावर किती दिवस उड्या मारणार, मिळेल त्या जागेत आता फक्त इमारती उभ्या केल्या जातात. विकास हा माणसांना जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी असला पाहिजे. अपेक्षा केव्हाच संपल्या आहेत. मतदानापुरतं मर्यादित न राहता नागरिकांनी दबावगट बनवला तर काही होऊ शकेल. नागरिक विकासात नसतील तर विकास हा अंगावरच येणार आहे. फुकट द्यायचं असेल तर ग्राउंड द्या बाकी काही देऊ नका. शहरातील प्रत्येक माणसाला चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे. नागरिकांचे जीवन सुसह्य करणं हे पहिलं काम आहे. बस फुकट देताय की मेट्रो फुकट देता यापेक्षा श्वास घ्यायला जागा देताय का हे महत्त्वाचं आहे."
"मतदानाला लोक बाहेर पडत आहेत. त्यांचा सिस्टीमवरचा विश्वास उडालेला नाही तर तो अजूनही आहे. तसंच लोकप्रतिनिधींसोबत आपल्यालाही काम करावं लागेल. अठरा वर्षांचा झाल्यानंतर मी एकही मतदानाचा हक्क बजावायचा सोडला नाही त्यामुळे मतदान करत राहा. राष्ट्रीय हक्क आहे, मूलभूत हक्क आहे तो बजावायलाच पाहिजे."