Video : सोनाली कुलकर्णीनं स्वतःच्या हातांनी साकारला घरचा बाप्पा, मातीपासून तयार केली सुंदर मूर्ती; म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 09:37 IST2025-08-27T09:35:17+5:302025-08-27T09:37:25+5:30
दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात.

Video : सोनाली कुलकर्णीनं स्वतःच्या हातांनी साकारला घरचा बाप्पा, मातीपासून तयार केली सुंदर मूर्ती; म्हणाली…
बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती अनेक कलाकार स्वत: घडवतात. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने तिच्या घरच्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्याच हाताने घडवली आहे.
सोनालीनं घरच्या बाप्पाची मूर्ती साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये ती म्हणते, "लेट पण थेट... Our बाप्पा is on its way! भेटू - पुर्ण अवतार घेऊन". तर व्हिडीओमध्ये ती म्हणते, "नमस्कार... वर्षांतील आवडते दिवस आलेत. गणपती बाप्पाचं आगमन आणि त्याची तयारी, मी आणि माझा भाऊ अतुल कुलकर्णी बाप्पाची मूर्ती बनवत आहोत". सोनालीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने मराठीसह हिंदी आणि साउथच्या सिनेमातही काम केलंय. सोनाली कुलकर्णीला मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणून ओळखली जाते. तिने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. याशिवाय 'नटरंग', 'मितवा', 'हंपी', 'व्हिक्टोरिया एक रहस्य', 'क्षणभर विश्रांती', 'गाढवाचं लग्न' आणि 'पोश्टर गर्ल' यांसारख्या बऱ्याच मराठी सिनेमात ती झळकली आहे.