सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:43 IST2025-01-13T11:43:16+5:302025-01-13T11:43:30+5:30

'संगीत मानापमान' या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी (Salil kulkarni) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Singer Salil Kulkarni Review Subodh Bhave Sangeet Manapman Movie | सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले...

सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले...

सध्या 'संगीत मानापमान' (Sangeet Manapmaan) या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. १० जानेवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. 'कट्यार काळजात घुसली'नंतर सुबोध भावेने (Subodh Bhave) 'संगीत मानापमान'च्या निमित्ताने दुसऱ्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींची सिनेरसिकांना पसंतीस उतरत आहेत. मराठी कलाविश्वातून  या चित्रपटावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. 'संगीत मानापमान' या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी (Salil kulkarni) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहलं, "संगीत मानापमान…!! तुम्ही बघाच आणि मुलांनाही घेऊन जा!! तुम्ही लहानपणी अमर चित्र कथा वाचली आहे ना? त्यात राजा, राजकन्या, सेनापती, युद्ध… हे वाचतांना डोळे विस्फारून तुम्ही त्या काळात गेला आहात ना? त्यातल्या एकेक पात्राचा आवाज तुम्हाला ऐकू यायचा? मला कायम यायचा… त्यांचं बोलणं ऐकू यायचं… आज खूप खूप वर्षांनी सुबोध भावेने पुन्हा एकदा मला एक अमर चित्र कथा दाखवली आणि ती सुद्धा अत्यंत रंजक आणि हळूवार पद्धतीने"

"चांदोबामधली परीकथा वाचतांना आलेली मजा, तिच निरागसता आणि सच्चेपणा मला खूप आवडला… सुबोधच्या आणि त्याने साकारलेल्या धैर्यधराच्या डोळ्यांत ते सच्चेपण चित्रपटभर दिसतं… सुबोध आणि शंकर महादेवन एकत्र आले की ते एक अफाट सांगीतिक अनुभव देतातच… खूप मोठे मोठे गायक कलाकार आहेत आणि ते सर्व कमाल गायले आहेत".

ते म्हणाले, "समीर सामंत हा आमचा कवीमित्र अनेक प्रकारे शब्दांची ताकद घेऊन वेगवेगळ्या संगीत प्रकारांना भिडला आहे. पण, घरात अनेक यशस्वी लोकं असतांना, एक आजोबा येतात आणि असा काही विचार मांडतात की सगळे स्तब्ध होतात, तसं हृषीकेश बडवेच्या आवाजात जेव्हा “रवी मी” आणि आर्याच्या आवाजातलं “मला मदन भासे हा” आणि प्रियांकाच्या आवाजातलं “नाही मी बोलत” येतं आणि आपण सगळेच ११२ वर्षांपूर्वी केलेल्या या गाण्यांना सलाम करतो. युद्धाच्या प्रसंगाच्या मागे “प्रेम सेवा शरण” असावं… यासाठी सुबोध आणि शंकरजींना द्यावी तेवढी दाद कमी आहे".


पढे ते म्हणतात, "सुमीत राघवन प्रत्येक कलाकृतीत आपल्याला भारावून टाकतोच… डॉ.लागू म्हणून त्याने केलेला डोळ्यांचा वापर आणि इथे केलेला वापर इतका कमाल आहे की डोळे आणि नजर ह्यातून काय आणि किती व्यक्त होऊ शकतं हे जाणवतं… उपेंद्र लिमये, अर्चना निपाणकर ,नीना कुळकर्णी, निवेदिता सराफ सगळेच उत्तम आणि शैलेश दातार या आमच्या गुणी मित्राला इतकी छान आणि मोठी भूमिका मिळाली आणि त्याने ती उत्कृष्ट साकारली ह्याचा खूप आनंद आहे. वैदेही परशुरामीसाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल किंवा कदाचित एखादं गाणंच करावं लागेल, इतकी अप्रतिम भूमिका तिने केली आहे… !! आज तिने तिचा एक मोठा फॅन तयार केला एवढं नक्की".

Web Title: Singer Salil Kulkarni Review Subodh Bhave Sangeet Manapman Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.