१८व्या वर्षी पळून जाऊन केलं लग्न, सुचित्रा बांदेकर म्हणाल्या- "जो माणूस काही करत नव्हता त्याच्यावरच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:58 IST2025-08-26T13:57:53+5:302025-08-26T13:58:20+5:30
Aadesh Bandekar And Suchitra Bandekar: आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडपे आहे. अलीकडेच सुचित्रा बांदेकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

१८व्या वर्षी पळून जाऊन केलं लग्न, सुचित्रा बांदेकर म्हणाल्या- "जो माणूस काही करत नव्हता त्याच्यावरच..."
आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडपे आहे. अलीकडेच सुचित्रा बांदेकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. तसेच त्यांनी मुलगा सोहम यांच्या लग्नावरही भाष्य केले. यावेळी सुचित्रा यांनी त्यांच्या लग्नाचा किस्साही सांगितला.
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी पळून जाऊन लग्न केले होते. त्यांच्या लग्नाबद्दल नुकतेच सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या की, मी आयुष्यात काहीच ठरवलं नव्हतं. मी लहानपणापासून काम करत आले. आईवडिलांनी कधीच अडवलं नाही. पण नंतर जो माणूस काहीच करत नाही, अशा माणसावर प्रेम जडले. आम्ही पळून जाऊन लग्न आणि हेदेखील ठरलेलं नव्हतं. एकदिवस सकाळी मी आदेशला जाऊन सांगितलं की, आता माझ्या बाबांना समजलं आहे आणि ते माझे लगेच लग्न लावणार आहेत तर आपण पळून जाऊन लग्न करूयात. त्यावेळी आदेश म्हणालेला की, बरी आहेस ना, मी पाच रुपये पण कमावत नाही. त्यावेळी सुचित्रा यांनी म्हटलं की, त्यावेळी त्यांनी मग आदेश यांना भेटू नका असा सल्ला दिला होता. सुचित्रा यांच्यावरील प्रेमापोटी नाते तोडण्याचा विचारही शक्य नव्हता, त्यामुळे आदेश यांनी लग्नासाठी होकार दिला.
१४ नोव्हेंबरला सुचित्रा-आदेश यांनी बांधली लग्नगाठ
सुचित्रा बांदेकर यांनी पुढे सांगितलं की, ज्यावेळी त्यांनी लग्न केले तेव्हा त्या १८ वर्षांच्या होत्या. १० ऑक्टोबरला मला १८ वर्ष पूर्ण झाले आणि १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाला आम्ही लग्न केले. मी तेव्हा 'कभी ये कभी वो' नावाची मालिका करत होते, त्यामुळे माझी कमाई बऱ्यापैकी होती. मात्र आदेशचा स्ट्रगल सुरू होता. लेडी लकमुळे त्यालाही छोटी-छोटी कामं मिळायला सुरुवात झाली.