"जगाला दिसलं, हा जुना भारत नाही" अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना, सावरकरांची आठवण काढत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:34 IST2025-05-20T15:33:22+5:302025-05-20T15:34:37+5:30

"आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करणार नाही", मराठी अभिनेत्याचं ठाम वक्तव्य

Saurabh Gokhale Talk About Operation Sindoor Narendra Modi Savarkar | "जगाला दिसलं, हा जुना भारत नाही" अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना, सावरकरांची आठवण काढत म्हणाला...

"जगाला दिसलं, हा जुना भारत नाही" अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना, सावरकरांची आठवण काढत म्हणाला...

Saurabh Gokhale: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) देखील दहशतवाद्यांना, हल्लेखोरांना सोडणार नाही अशा शब्दात सरकारची भूमिका जाहीर केली. त्यानंतर, पाकिस्तानविरोधात व्यापार संबंध, जलसिंधू करारासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. भारतीय सैन्याने 'हा नवीन भारत आहे' हे  दाखवून दिलं. या कारवाईनंतर देशभरातून सैन्य आणि सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनीही आपली प्रतिक्रिया देत सरकारचं कौतुक केलं. मराठी अभिनेता सौरभ गोखले यानेदेखील खास शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सौरभ गोखलेनं नुकतंच सामला मुलाखत दिली. यावेळी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचं खुलेपणानं कौतुक केलं आहे. तो म्हणाला,  "खूप वर्षांनी आपल्या असे पंतप्रधान आणि असं केंद्रीय मंत्रीमंडळ लाभलं आहे, ज्यांनी एक ठाम भुमिका घेतली. त्यांनी जगाला दाखवून दिलं की हा जुना भारत नाही, जो कुणाचं काहीही ऐकून घेईल. पहलगाम हल्ला झाल्यानंतर अनेक जणांनी सरकार काहीच करणार नाही, बोलणी करुन शांत बसेल, अशा वल्गना करायला सुरुवात केली होती. पण, मग अचानक सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईनं अख्ख्या जगाचे डोळे उघडले. आता काहीही सहन करणारा हा भारत राहिलेला नाही, हे दिसलं. एक भारतीय असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे".

पुढे तो म्हणाला, "माझ्या ओळखीतील लष्करामध्ये काम करणारी अनेक लोक आहेत. जेव्हा त्याचं एखाद्या ठिकाणी पोस्टींग असतं, तेव्हा त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनादेखील कधी-कधी त्याबद्दल माहित नसतं. पण, या गोष्टी लोकांसमोर पोहचत नाहीत. पहलगाम हल्ला ही अत्यंत वाईट गोष्ट होती. लोकांनी दुःखद अनुभव घेतलेत. मला या गोष्टीचं दुःख झालं होतं की, त्यांचे अनुभव हे ट्विस्ट करुन काही राजकीय नेत्यांनी लोकांसमोर मांडले. त्यांची वाक्य बदलून ती सादर केली गेली. पण, हे सगळं होत असतानाही आपल्या सरकारनं ज्या पद्धतीनं कारवाई केली, ते पाहून आता नाही वाटतं की भविष्यात इतर कुठल्या देशाची हिंंमत होईल आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची".

भारतीय महिला अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाचं कौतुक करत तो म्हणाला, "ज्या पद्धतीने दोन महिला अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांना खरंच सलाम करावा लागेल. सावरकरांनी मॅझिनी यांच्या चरित्राचा मराठीत अनुवाद केला होता. त्यानंतर त्यांनी लिहिलं होतं की 'जेव्हा आपल्या देशातील तरुणी रस्त्यावर खाडखाड बूट वाजवत चालतील, तेव्हा कोणाचीही हिंमत होणार नाही वाकड्या नजरेने पाहण्याची.’ हे आता आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. जेव्हा महिला आपल्या लष्कराचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा देशाची खरी ताकद लक्षात येते, आणि मग संपूर्ण देश खंबीरपणे त्यांच्या मागे उभा राहतो".

Web Title: Saurabh Gokhale Talk About Operation Sindoor Narendra Modi Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.