"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:02 IST2025-01-21T16:01:47+5:302025-01-21T16:02:05+5:30
सौरभ गोखलने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले?
हिंदी-मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. एक लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. तो कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. सौरभ हा अनेक गोष्टींबद्दल स्पष्टपणे मत मांडत असतो. सौरभ सोशल मीडियावर सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतोच. आताही सौरभ गोखलने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सौरभ गोखलने मराठी हॉटेल मालकांच्या परप्रांतीय कामगारांबाबत भाष्य केलं आहे.
सौरभ गोखलने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, "मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, क्लिनर, मॅनेजर हे मालक हॉटेलात नसताना धोतराच्या सुटलेल्या कासोट्यासारखे असतात. बेताल... बेलगाम…वेळीच जागच्या जागी खोचला नाही, तर तो पायात अडकून मालकाला तोंडावर पाडतो. नाहीतर चारचौघात मालकाचं धोतर सोडतो. वाचकांनी या हॉटेलचे नाव ओळखल्यास त्यांना शेजारच्या हॉटेलमध्ये फिंगर बाऊल फ्री", असं सौरभने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सौरभची ही पोस्ट सध्या चर्चेत आहेत.
सौरभ गोखले हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने वेगवेगळ्या मालिकेतून आणि चित्रपटातून आपली छाप सोडली आहे. सौरभ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'राधा ही बावरी' या मालिकेतून तो प्रसिद्धीझोतात आला होता. 'उंच माझा झोका' मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'सर्कस', 'सिंबा' या रोहित शेट्टीच्या सिनेमांतही तो झळकला आहे.